Showing posts with label रोटी की टोकरी. Show all posts
Showing posts with label रोटी की टोकरी. Show all posts

Thursday, February 14, 2019

गुळाची पोळी


गुळाची पोळी

साहित्य: अर्धा किलो बारीक किसलेला गूळ, अर्धी वाटी तीळ - भाजून पावडर करून, चार चमचे खसखस भाजून पावडर करून ५/६ चमचे तेल, ४ चमचे चणा डाळीचे पीठ, अर्धा चमचा वेलची पूड, एका हरबऱ्या इतका ओला खाण्याचा चुना.

वरची पारी: १ भांडे कणिक, एक भांडे मैदा, एक चिमूट मीठ, ४ चमचे तेल. पोळी लाटण्यासाठी थोडा मैदा

कृती:

v  गूळ किसून घ्यावा.
v  तीळ आणि खसखस भाजून बारीक पावडर करून घ्यावी आणि गुळात मिसळावी.
v  तेल तापवून त्यात डाळीचे पीठ घालून खरपूस भाजून घ्यावे.
v  हे मिश्रण गरम असतानाच गुळावर घालून चमच्याने हलवून घ्यावे.
v  गार झाल्यावर त्यात खाण्याचा चुना आणि वेलची पूड घालून चांगले मळून मोठ्या लिंबातून थोडे मोठे गोळे करून ठेवावे.
v  कणिक आणि मैदा एकत्र करून घ्यावा. मीठ घालावे.
v  तेल गरम करवून कणकेत घालून ते सर्व कणकेला चोळून घ्यावे.
v  त्यात जरुरी प्रमाणे पाणी घालून घट्ट भिजवून सुमारे अर्धा तास ठेवावी.
v  कणकेचे प्रत्येक पोळीसाठी दोन छोटे गोळे करावेत.
v  एक साधारण गूळ इतका आणि एक त्याहून थोडा लहान.
v  त्याच्या छोट्या लाट्या लाटून घ्या. एक लहान एक मोठी.
v  मोठ्या पारी वर गुळाची गोळी चपटी करून त्यावर ठेवावी आणि त्यावर लहान पारी ठेवून कडेने सगळ्या बाजूने बंद करून घ्या.
v  थोडया मैद्यावर पोळी पातळ लाटून घ्या.
v  नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

§  चुन्यामुळे गूळ पोळीच्या बाहेर येत नाही.
§  पोळी खुटखुटीत कडक झाली पाहिजे.
§  कणिक घट्ट भिजवली गेली नाही तर पोळी मऊ पडेल आणि त्याचे तुकडे पडतील.
§  या पोळ्या साधारण आठ दिवस टिकतात.

Thursday, July 6, 2017

घडीची पोळी


साहित्य : - ३ मोठे डाव कणिक, पाव चमचा मीठ, तेल, पाणी, १ चमचा दही
कृती : - एका गोल पसरट भांड्यात कणिक घ्या. शक्यतो चाळू नका कारण पीठातून कोंडयावाटे फायबर्स निघून जाऊ नयेत.
त्यात मीठ आणि दही घालून मिसळून घ्या.
गरजेनुसार पाणी हळूहळू घालत कणिक भिजवून घ्या.
रोजच्या पोळ्यांची कणिक ही फार घट्ट अथवा फार सैल असता कामा नये.
योग्य घट्ट भिजवल्यावर साधारण २/३ चमचे तेल घालून छान मळून घ्या. हाताला किंवा भांड्याला कुठेही कणिक चिकटून न राहणे ही कणिक नीट भिजली गेल्याची खूण आहे.
पोळ्या करण्यापूर्वी साधारण अर्धा तास अशी कणिक भिजवून ठेवणे उत्तम.
पोळी लाटण्याआधी पुन्हा एकदा कणिक नीट तिंबून घ्या.
मोठ्या लिंबापेक्षा थोडे मोठे असे एकसारखे गोळे करून घ्या.
ताव तापत ठेवा.
पिठी म्हणून लावण्यासाठी शक्य असल्यास तांदूळ पिठी घ्या. म्हणजे पोळी लाटताना सरसर सरकते. नसल्यास गव्हाचे पीठ ही चालू शकते.
गोळा पुरीएवढा लाटून घ्या.
त्यावर तेलाचा हात फिरवून थोडी पिठी भुरभुरावा.
मधे घडी घालून पुन्हा तेलाचा हात आणि त्यावर पिठी घालून अजून निम्यात घडी घाला.
आधी अर्धगोल आणि नंतर पाव- गोल अशी घडी होईल.
ही पोळीची घडी पिठीत घोळवून पुन्हा लाटायला सुरुवात करा.
सुरुवातीस तिन्ही कडा लाटून गोल आकार द्या.
आता पुन्हा साधारण गोल आकाराची जाड पोळी होईल.
आता कडकडून लाटत पोळी मोठी लाटून घ्या. साधारण डावीकडून उजवीकडे गोल अशारितीने लाटावी.
सर्वात शेवटी मधून एकसारखी करून घ्यावी.
योग्य तापलेल्या तव्यावर पोळी टाकून २/४ सेकंदात उलटावी.
दुसरी बाजू नीट भाजून घ्यावी. पुन्हा पोळी उलटून भाजून घ्यावी. यावेळी पोळी फुगेल आणि तिचे पदर सुटतील.
कणिक योग्य रितीने भिजवली असेल आणि नंतर नीट लाटली असेल तर पोळी मऊसूत, टम्म फुगलेली आणि पदर सुटलेली होते. अशी पोळी पूर्ण दिवस चांगली राहते. कडक किंवा चामट न होता. दही घातल्याने पोळी अजून मऊ बनते.