Thursday, March 29, 2018

जुन्या पानावरुन काही भाग २ -घडलंय....बिघडलंय.....

Friday, August 24, 2012


घडलंय....बिघडलंय.....


"ह्याला निव्वळ माज म्हणतात" माझी एक कलीग खूप चिडून म्हणाली.
"माज काय त्यात? तू खाऊन तर बघ." मी
"नाही खाणार, इथे लोकांना यावर्षी आंबे मिळत नाहीत, आणि तू आंब्याची कढी बनवून आणलीस, अजिबात खाणार नाही"
"अगं,  आता मला ही रेसिपी संजीव कपूरच्या पुस्तकात मिळाली, आणि घरात आंबे ही होते, मग म्हटलं पाहू बनवून, माज वगैरे म्हणत नाहीत हं याला"- मी

हा संवाद या उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणाच्या टेबलवर घडला. पहिल्या घासाबरोबर लक्षात आले, या रेसिपीत काही मजा नाही म्हणून. पण बनवली होती मोठ्या उत्साहाने, खाणे भाग होते. मनातल्या मनात मी त्या पुस्तकातला "आंब्याच्या कढीचा" सुंदरसा फोटो आठवत कशीबशी संपवली ती. कलीगचा राग ही नवीन गोष्ट होती पण असे पदार्थ बिघडण्याची काही ही पहिली वेळ नव्हती.

लग्नानंतरचे  अगदी सुरुवातीचे दिवस, साबा आणि नवरा ऑफिसला जाऊ लागले होते, पण माझे सासरे मात्र घरी होते, त्यांची सुट्टी अजून शिल्लक होती. सकाळी नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. फ्रीज मधून सिमला मिरची ओट्यावर काढून ठेवली होती. ते सहज आत डोकावले. मिरच्यांकडे पाहून म्हणाले " नारळ किंवा पीठ पेरून सुकी भाजी करू नकोस, रसदार भाजी कर". अरे बापरे, झाली का पंचाईत, सिमला मिरचीची रसदार भाजी कशी करायची ते मला माहित नव्हतं. विचारून कोणी सांगेल असं कोणी शेजारी पण नव्हते, आणि माझी ओळखही नव्हती. त्यांच्या समोर आई, काकू, आत्या यांना फोन करून विचारायचे धाडसही नव्हते. मुंबई-पुणे STD करावा लागायचे दिवस होते ते. नारळाचे वाटण करून रसभाजी बनवावी असा विचार केला. पण चांगली होईल अशी खात्री वाटत नव्हती. चेहऱ्यावर माझ्या अनेक प्रश्न होते. पुन्हा काही कारणांनी ते आत डोकावले. वाशीत अगदीच छोटंसं घर होतं आमचं. त्यांना माझा चेहरा वाचता आला असावा. सहज बोलल्यासारखे म्हणाले " काही नाही चिंच-गुळ, गोडा मसाला आणि दाण्याचे कूट, मस्त होईल भाजी, कर तू आपण खाऊ" भीतभीत बनवली आणि मस्त झाली भाजी. जीव भांड्यात पडला.

मग काही दिवसातच मी ही नोकरी करू लागले. साबा अनेकदा सकाळी ६ लाच घर सोडत, आणि आम्ही बाकी तिचे ८ ते ९ च्या दरम्यान एका पाठोपाठ. आपोआपच सकाळी आम्हा तिघांचे डबे मला बनवावे लागत. चुकत माकत बनवलेले पदार्थ असायचे डब्यात. छान झालेल्या पदार्थाची ते घरी येऊन लगेच तारीफ करत, पण बिघडलेल्या एखाद्या भाजी बद्दल एक शब्द ही कधी त्यांनी त्या सुरुवातीच्या दिवसात काढला नाही. ते सरकारी ऑफिसर होते, अनेक वर्षांची ऑफिसमधील मित्र मंडळी त्यांच्या सोबत लंचला असत, कसे त्यांनी ते असे पदार्थ त्यांच्याबरोबर शेअर केले असतील ह्या विचाराने मला खूप अपराधी वाटत असे.

मग मी हळू हळू या कलेची पुस्तके जमवत गेले. निरीक्षण वाढवत गेले. कोणाच्या घरी गेल्यावर, निरीक्षण करू लागले तिथल्या स्वयंपाक  घराचे  आणि त्या अन्नपूर्णेचे. चाखत असलेला पदार्थ कसा बनवला असेल याचा विचार करू लागले. थोडा स्वत;च्या मेंदूला ताण देत प्रयोग करू लागले. अशाच  प्रयोगातून पहिल्या दिवाळीत "पुलाव" इतका सुंदर झाला. आधी साधीच रूपरेखा त्या पदार्थाची तयार होती डोक्यात. जस जशी तयारी करत गेले, तसतश्या एक एक वाढीव गोष्टी सुचत गेल्या, जसा की पाण्या ऐवजी दूध त्यात थोडे केशर, कांदा, बटाटा, काजू तळून, फरसबी, गाजर, मटार उकळत्या पाण्यातून काढून, फ्लॉवर थोड्या हळदीच्या पाण्यातून शिजवून. इतर मसाल्याबरोबर कोथिंबीर आणि पुदिनाही घातला. त्यात घालायला पनीर आणून ठेवले होते. खावा ही होता घरात. दोन्ही किसून घेतले. त्यात थोडी हिरवी मिरची, आले, लसूण वाटून घातले, मीठ आणि थोडे कॉर्न-फ्लोर. लहान गोळे बनवून ते तळले. असे हे सोनेरी गोळे शेवटी तयार पुलाववर पसरले. अहाहा काय स्वाद होता त्यात!

पुस्तकेही या बाबतीत कधी कधी चकवतात. अनेकदा लिहिल्याबर हुकुम पदार्थ बनवला तर बिघडू शकतो, जसे की हलके सोनेरी गुलाबजाम तळून घ्या किंवा कांदा गुलाबी होई पर्यंत तळून घ्या - जर शब्दश: तसे केले तर कच्चेच राहतील. तर काही जसे लिहिले तसेच बनवावे लागतात, आपली अक्कल चालवून त्यात काही बदल केले तर हमखास बिघडतात. जसे  मी एकदा "आंब्याचे मूस" बनवताना चालवले होते. लग्नाच्या वाढदिवसासाठी आदल्या दिवशी सेट करायला ठेवलेले "मूस" त्या नंतर चार पाच दिवसांनी सुद्धा सेट झाले नव्हते.

बिघडणार्या पदार्थांना कसे वाचवायचे याचे कोडे हळू हळू सुटत गेले. गोड पदार्थांसाठी घरात पिठीसाखर, दुध पावडर, किंवा काजू बदामची पावडर असे हाताशी असले, आणि त्यावर थोडी मेहनत करायची तयारी असली की मग झालं. बिघडू पाहणाऱ्या तिखट पदार्थांसाठी उकडलेला बटाटा, ब्रेंड, मैदा असे पदार्थ उपयोगी पडू लागले. कधी कधी बिघडत जाणाऱ्यावर केलेला प्रयोग, ओरिजिनलपेक्षा सरस ठरला, आणि नंतर दर वेळी तसाच बनू लागला. जसे की एक वर्षी गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत होते. काही केल्या ते घट्ट व्हायलाच तयार नाहीत. अर्धी वाटी काजू आणि पिस्त्याची पूड त्यात घातली. चांगले न लागायला काय झालंय? दुसऱ्या दिवशी, गणपतीच्या सकाळच्या  आरती नंतर प्रसाद वाटून झाल्यावर बहिण आणि जावेला "कसे झालेत" असे विचारले. "Don't tell me! ये आपने घरपे खुद बनाये है?" - इति माझी अमराठी जाऊ. "तू केलेत ना, मग उत्तमच असणार, काही लोकांनी काहीही बनवलं तरी ते by default चांगलेच बनते"- इति बहिण.

काळासोबत मी  वेगळा आणि उत्तम पदार्थ सहजगत्या बनवू लागले. या बाबतीत मी माझीच स्पर्धक झाले. हळू हळू कोणी मला एखाद्या पदार्थाची रेसिपी कशी विचारू लागले मलाच कळले नाही. मुळातच या विषयावर बोलायला आवडत असल्यामुळे मी ही शक्य तितक्या डीटेलमध्ये ती रेसिपी शेअर करते. हातचं काहीही राखून न ठेवता! माझ्या हाताची जी चव आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाताला कशी येईल ? कदाचित माझ्यापेक्षा ही उत्तम बनवेल. तरी हरकत नाही.

माझ्या किचनरुपी प्रयोगशाळेत असे प्रयोग गेली अनेक वर्षे कधी घडले, कधी बिघडले. पदार्थ घडले किंवा बिघडले असं म्हणण्यापेक्षा त्यांनी मला घडवलं. चांगला स्वयंपाक बनवता येण्यासाठी एक नजर दिली. बिघडलेल्या पदार्थांनी त्यातूनच काहीतरी नवीन घडवायची दिशा दाखवली, बिघडलेल्या पदार्थाने अश्रू गिळायला शिकवलं, जमून आलेल्याने कौतुकात सुखावून जायला शिकवलं.....

माझ्या घरी, नात्यात, मित्र मंडळीत असे काही जण आहेत की ज्यांना माझ्या हाताचे जेवण विशेष आवडत नाही, तर दुसऱ्या बाजूस खूप मनापासून दाद  देवून खाणारे ही काही कमी नाहीत. पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस येऊ घातलेत, वेळ नाही म्हणत म्हणत मी काही प्रयोगांसाठी वेळ काढेनच. नवरा एक दोन सूचना करत पदार्थ छान झालाय म्हणेल, कन्यकेच्या चेहऱ्यावरूनच कळेल, दादा म्हणजे माझे सासरे "उत्तम झालाय " अशी दिलखुलास दाद देतील  तर साबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने "चांगला झालाय" असे दुसर्यांना कौतुकाने सांगतील. माझी एक लहानशी मैत्रीण जी मला "मॉम" म्हणते ती तिरकसपणे "वॉव, क्या खाना बनाती ही तेरे घर की रोटी बननेवाली ऑन्टी. मी लग्न झाले की तिला तुझ्या घरून घेवून जाणार" असे म्हणेल.  आजचे हे लिखाण त्या सर्वांसाठी!


No comments:

Post a Comment