पदार्थ बनवणे आणि खाणे मनापासून आवडणाऱ्या मला या विषयावर बोलायला
आवडत असे पण कधी काळी मी ब्लॉग स्वरूपात त्यावर काही लिहीन असे कधी मला
वाटले नव्हते. अर्थात हा विषय अधून मधून माझा ब्लॉग "मी ..... माझे .....
मला " वर डोकावला होता. पण मुळातच तो ब्लॉग सातत्याने काही वर्ष लिहिला जात
नव्हता.
त्या ब्लॉग वरच्या काही पोस्ट्स मी इथे पुन्हा शेअर करत आहे.-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Wednesday, November 28, 2012
कांदा मुळा भाजी.......
लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची
गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे.
भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका
मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे
आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती
भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन
आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा
निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती. ढीगभर
भाजी घरी घेऊन येण्यात, तिच्या ताजा वास श्वासात भरून ठेवणेच इतके आनंददायी
असते की हा त्रासाचा विचार ठेव्हा मनात कधी येतच नसे.
अजूनही ही गोष्ट तितकीच आवडीची आहे. भाजी
मंडईत जावे, ताज्या ताज्या भाज्या बघितल्या की काय घेऊ अन काय नको असे होऊन
जाते. दिवसाचे १०/१२ तास ऑफिसमध्ये जिचे जातात तिला रोज जाता येता भाजी
घेणे शक्यच नाही. त्यामूळे आठवड्याची भाजी एकदमच हा शिरस्ता गेली अनेक
वर्षे आमच्याकडे आहे. अशारितीने भाजी आणणे, निवडून वेगवेगळ्या प्लास्टिक
मध्ये ठेवणे म्हणजे आठवडाभर आज काय भाजी करावी ही चिन्ता मिटते. मात्र
वीकेंड मधल्या कोणत्या दिवशी भाजी आणायची, किती आणायची, तिची उस्तवार
करायला कशी जमणार आहे याचा आधी विचार करावा लागतो, पण म्हणून काही त्यातली
मजा कमी होत नाही. त्यातून हा ऋतुच आनंदाचा ठेवा असावा असा ताजा तवाना.
रविवारी सकाळीच मंडईत शिरावे. कोणत्या नव्या
भाज्यांचे आगमन झाले आहे याचा अंदाज घ्यावा. तुरीच्या शेंगा, गाजर, मटार
आणि मेथीच्या ताज्यातवान्या गड्ड्या दिसू लागणे ही माझ्या मंडईत जाण्याच्या
आनंदाची परिसीमा असते. उंधियो, मेथीचे विविध प्रकार जसे की ठेपले, भरपूर
लसूण घालून केलेली सुकी भाजी, मेथी गोटे, गाजर हलवा, मटार करंजी, मिक्स
भाज्यांचे सूप, लोणचे असे विविध प्रकार मनात डोकावू लागतात. त्यामुळे
भाज्या घेत घेतच माझा आठवडाभराचा मेन्यू मनातल्या मनात तयार होतो. आत
शिरल्याबरोबर मिरची, आले लसूण याचा गाळा असतो. थंडी पडू लागलीये, थोडे आले
जास्त घेवूया म्हणजे वड्या करता येतील. लसूण ही घ्यायला हवा, थोडी सुकी
चटणी करून ठेवायला हवी. मग पुढचा गाळा असतो रसरशीत टोमाटोचा. रविवारी पुलाव
आणि सार करावे का? कोणी पाहुणे येणार आहेत का, कोणता सण आहे का,
एखादा खास पदार्थ बरेच दिवसात झाला नाही अशी घरच्या दोन थोर व्यक्तींकडून तक्रार येण्याची शक्यता आहे का या
आठवड्यात हे एकदा आठवून पाहावे आणि त्या नुसार भाज्या घेत जावे. किती
पालेभाज्या आपल्याचाने निवडून होतील याचा अंदाज घेत त्यांना ही पिशवीत जागा
करून द्यावी. मग स्वीट कॉर्न मला न्या म्हणत मागे लागतो, म्हणून त्यास
घ्यावेच लागते. आजकाल लाडावलेल्या मुलासारखा तो झाला आहे.
उपासाचे दिवस असतील तर मग रताळी कुठे दिसतात का ते पाहावे ला गते,
म्हणजे एकादशीची सोय होईल, रताळ्याच्या गोड काचऱ्या, तिखट कीस,
हे पदार्थ साबुदाण्याचे वडे किंवा थालीपीठ सोबत तांबड्या भोपळ्याचे भरीत,
ओल्या नारळाची चटणी असले की उपासाचे ताट कसे भरल्यासारखे वा टते नाही?
तुरीच्या शेंगा दिसल्या की उन्दियोच्या इतर
भाज्या जसे की कंद, सुरती पापडी, कच्ची केळी आल्यात का हे पहावे,
सगळ्या पाव पाव किलो घेत घरी जावून उंधियो बनवावा आणि पु ढचे २/३ दिवस मनसोक्त त्यावर ताव मारावा नाहीतर तुरी च्या शेंगाना घरी
नेवून मीठ हळद घालून उकडून टेबलवर ठेवून द्याव्यात, बघता बघता संपून
जातात. भाद्रपदात मिळणाऱ्या मावळी काकड्या दिसल्या की मग हळदीची पाने कुठे
मिळतील ते पाहावे म्हणजे गोड पानग्या करता येतील. भरपूर कोथिंबीर आली की मग
एकदा वड्या झाल्याच पाहिजेत. छान केशरी दळदार भोपळा आहे, तो घारगे बरेच
दिवसात झाले नाहीत अशी आठवण करून दिल्याखेरीज राहात नाहीत. मटार चांगला आला
आहे, भरपूर घरी न्यावा, एकदा मटार उसळ आणि पाव हा बेत, कधी मटार भात तर
कधी मटार करंजीचा बेत करावा. फेब्रुवारी संपता संपता फणसाच्या कुयऱ्या
दिसतात का याचा शोध घ्यावा किंवा आसपासच्या कोणत्या घरी फणसाचे झाड आहे ते
लक्षात ठेवून त्यांना सांगून ठेवावे. आजकाल मला वर्षभर ओले काजू सुकवून
ठेवता येण्याची पध्दत कळली आहे, त्यामुळे फणस आणि ओले काजू याची भाजी,
त्याला वरून लाल मिरचीची फोडणी म्हणजे सुख! तसा नोव्हेंबर ते जानेवारी हा
काळ म्हणजे या सुखाचा परमावधी. इतक्या प्रकारच्या भाज्या या दरम्यान उपलब्ध
असतात की काय घेऊ आणि काय नको असे मला होऊन जाते. घरी नेलेल्या भाज्यांची
उस्तवार करता यावी आणि विविध चवींचे खास पदार्थ बनवता यावेत म्हणून न या
कालावधीत वीकेंड २ नाही तर ३/४ दिवसांचा असावा अशी फार इच्छा आहे.... :)
आवळे घरी न्यावेत, किसून सुपारी, थोडा
मोरावळा करून ठेवावा. थोडे लोणचे करावे त्यात थोडी आंबे हळद जी ओली मिळते
या काळात, ती घालावी. लिम्बांचे गोड लोणचे बनवून ठेवावे, उन्हाळ्याची बेगमी
म्हणून सरबताची सोय करून ठेवावी. पालक वर्षभर मिळतो, पण या काळात तो
जास्तच ताजा टवटवीत वाटतो, त्याच्या पुऱ्या कराव्यात. भरली वांगी किंवा
खानदेशी वांग्यांचे भरीत करावे, सोबत गरमागरम भाकरी आणि ताजे लोणी. किंवा
भरपूर लसूण आणि तेल घालून केलेली आंबाडीची भाजी .... आहाहाहा..... एरवी
जास्त न आवडणारे पावटे पण या काळात कधीतरी उसळ करून चविष्ट लागतात.
नवरात्रात कधी काकडीसारखी लांबसडक जांभळी वांगी मिळतात, त्यांचे काप
करावेत, डाळीचे पीठ, मीठ तिखट लावून थोड्या तेलावर भाजले की किती खातो हेच
कळत नाही, तीच गत सुरणाच्या कापांची.
थोडी
शोधाशोध केली तर लसणीची पात मिळते कधी...थोडी कधी आमटीत टाकावी नाहीतर कधी
छानशी चटणी करावी. इतर कोणत्याही सिझन मध्ये मिळणारा मुळा या ऋतूत मला
नेहमीच चविष्ट वाटत आलाय. जवळपास चक्का वाटावा इतकं घट्ट दही घ्यावे, त्यात
ओला नारळ, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची मिठाबरोबर वाटून,सोबत चिमुटभर
साखर...सही लागते ही कोशिंबीर!
याच काळात फळे ही भरपूर येतात यामुळे चिकू
शेक, स्ट्राबेरी किंवा सफरचंद शेक, फ्रुट सलाड हे ओघाने आलेच.
(दूध आणि फळे एकत्र करून खावू नये या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून) नु कती
नुकतीच दिसू लागलेली द्राक्षे, स्ट्राबेरी संत्री यांचा घरी वावर वाढतो तो
थेट आंब्यांचे घरी आगमन होई पर्यंत. फळांची रेलचेल मग कधी इतकी होते की मग
कोबीच्या कोशिम्बीरीत द्राक्षे दिसू लागतात, काकडीसोबत घट्ट दह्यात मीठ
मिरची लावून डाळिंबाचे दाणे जावून बसतात तर कधी सफरचंद, डाळिंब,
काकडी, अननस आणि थोडे अक्रोड चुरून घातले की थोड्या मीठ मिरपुडीने सुरेख
सलाड तयार होते. कधी सफरचंदाचा कधी अननस घालून केलेला शिरा जेवणाची लज्जत
वाढवतो. तर कधी क्रीम मध्ये थोडी साखर घालून फेटले आणि भरपूर स्ट्राबेरी
त्यात घातल्या की एक सुंदर डेझर्ट तय्यार!
बघता बघता हा हिरवागार सीझन संपू लागतो, हळू
हळू मंडई रुक्ष भासू लागते. त्याच त्या ४/५ भाज्या दर आठवड्याला घरी नेतोय
की काय असे वाटू लागते. थोडा पाराही चढा होवू लागतो. जेवण तितके आनंददायी
वाटेनासे होते. मग फळांचा राजा पुन्हा अवतरतो आणि सारा रुक्ष नीरसपणा दूर
करतो. पानात रोज सकाळ संध्याकाळ आमरस असला गरमागरम पोळी किंवा भातासोबत की
मग कोणती भाजी आहे किंवा नाही याने काही फरक पडेनासा होतो. आंबा, फणस,
जांभळे, करवंदे, चेरी, खरबूज, कलिंगड ही फळे मात्र दिवस रसदा र करतात आणि उन्हाळा थोडा सुखाचा जातो. याच
उन्हाळ्यात थोडी पावसाळ्याची बेगमी म्हणून थोडे सांडगे, भरल्या मिरच्या,
थोड्या कुरडया (भाजी साठी) करून ठेवाव्यात. पावसाळ्यात मंडईत जाणेच नकोसे
होते. कसेबसे ते दिवस ढकलून मी मनापासून वाट पाहत राहते या हिरव्यागार,
ताज्या टवटवीत दिवसांची!
(त्याचं काय आहे की
एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे
फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य...त्यामुळे सर्व फोटो
आंतरजालावरून साभार.)
No comments:
Post a Comment