Sunday, March 25, 2018

गुलाबजाम सिनेमाच्या निमित्ताने......


गुलाबजाम  सिनेमा दोन वेळा पहिला, थिएटरमध्ये जाऊन चार दिवसाच्या अंतराने. दोन वेगळ्या व्यक्तींसोबत पहिला हे होतेच पण त्या सिनेमाचा गाभा हा कुठेतरी अंतरीशी घट्ट जुळलेला धागा आहे म्हणूनही कदाचित. आपण आपल्याला जेंव्हा छान वाटत  असतो तेंव्हा जास्त वेळा आपण आरशात बघतो तसेच काहीसा मी तो सिनेमा पुन्हा बघितला, कदाचित अजूनही अनेकदा बघेन. तो आवडला की नाही हे सांगता येणे अवघड. कारण जसेच्या तसे नसले किंवा त्यातली गोष्ट आपली नसली पण  तरी त्यातला विचार जर आपल्याशी नाळ जोडणारा असेल तर मग आवड निवड, चांगले वाईट याच्या पलीकडे जाऊन त्या कलाकृतीकडे आपोआपच पहिले जाते. तसेच काहीसे हा सिनेमा बघताना झाले माझे. तो पाहिल्यावर मनात रेंगाळला. स्वयंपाक  या विषयातील अनेक माझ्या डोक्यातले विचार वर येत राहिले. ते एकसंधपणे मांडून आपणच त्या साऱ्याकडे नीट पाहावे, ते नीट पारखावेत अशी निकड निर्माण झाली. काही मनातले, पण जाणिवेत नसलेले विचार त्यांना मुख्य विचारधारेचा भाग बनवणे आवश्यक वाटले  आणि हा तो सारा प्रपंच !

हे सारे मी लिहीत आहे याचा अर्थ मी कोणी राधा आगरकर आहे का की  जिच्या हातचे खाऊन रोज पाच पन्नास जीव तृप्त होतात, किंवा असे एखादे फूड जॉईंट जिचे आहे आणि पुण्यात अनेक फूड जॉइंट्सचा असतो, तसा उदोउदो होणारे  ..... किंवा भल्यामोठ्या खटल्याच्या घरातील कर्ती स्त्री ?  नाही....  असे काहीच नाही. एक सामान्य स्त्री जिला स्वयंपाक करायला आवडतो,त्याची कटकट त्रास वाटत नाही,  त्यावर बोलायला त्याहून जास्त आवडते, खास चवी मनात जपायला आवडतात, आपल्या रेसिपी शेअर करायला आवडतात कोणतेही हातचे राखून न ठेवता, अशी मी सामान्य स्त्री जिच्यासाठी तिच्या जवळच्या व्यक्तींसाठी साठी स्वयंपाक बनवणे ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. अगदी उद्या ते करणे गरजेचे राहिले नाही तर ही कला आपला एक दिवस निरोप घेईल असे जिला वाटते अशी मी स्त्री !

गुलाबजाम सिनेमा पाहताना त्यात एक प्रसंग आहे, सिद्धार्थ एक गुलाबजाम तोंडात टाकतो आणि ब्रह्मनंदी अवस्थेला पोचतो,  ते दृश्य पाहताना, पहिल्या वेळी माझ्या सोबतच्या व्यक्तीने, ज्याच्यासाठी मी काही बनवणे हा माझा सर्वात मोठा आनंदठेवा आहे  त्याने, "हे असेच घडते, तुझ्या हातचे पदार्थ खाताना" असे सांगणे, याहून अधिक मोठी  आणि हवीहवीशी पावती काय असू शकते? खरे तर हवेहवेसे सारे मिळाले मला त्या एका वाक्यात!

अनेकदा आपल्याला सांगितले जाते की माणसे, परिस्थिती ही जशी आहेत तशी स्वीकार. ते  मला जमते कि नाही हे ठाऊक नाही,  पण स्वैपाकघरातील सर्व घटकांना मात्र मी त्यांच्या गुणदोषांसह नक्की स्वीकारलेले असते, ते ओळखून त्यांच्याशी कसे वागायचे हे काळाच्या ओघात ठरत गेलेली गोष्ट. गरम मसाला कसा वापरायचा, पोटास हानिकारक पदार्थाना कसे दूर ठेवायचे, मग त्यांच्या बदल्यात काय वापरायचे, पदार्थ शक्य तितका पौष्टिक कसा बनेल हा विचार असेल तर मग साऱ्या घटकांचे गुणदोष आधी जाणणे आवश्यक.  कांदा कसे काम करेल, आधी आपल्याला रडवेल, मीठ तिखट त्यास भेटले की स्वतः त्याहून अधिक रडेल मग आपण आपले डोळे पुसून त्याची काळजी घ्यायची, लसूण त्याची एक विशिष्ट उग्र चव कायम ठेवेल, हिंग पदार्थ खमंग बनवेल पण त्याचा अतिरेक मात्र सारे बिघडवेल, कांदा आणि हिंग यांचे एकमेकांशी पटत नाही, त्यांची मोट आपण बांधायची नाही, हिरवी मिरची कधी वापरायची आणि लाल तिखट कधी वापरायचे, ओला नारळ कधी आणि शेंगदाण्याचे कूट कधी वापरायचे  हे शास्त्र आणि त्याहून अधिक अनुभव तुम्हाला शिकवेल, कोणता तांदूळ कोणत्या पदार्थासाठी योग्य  जसे की पुलाव बिर्याणी साठी उत्तम प्रतीचा बासमती हवा , पण साखरभात करताना सुवासिक आंबेमोहोर असल्यास अधिक चांगले, तेच घरात पावसाळी वातावरणात गरम वरण भात आणि तूप लिंबू हा हवासा बेत असल्यास इंद्रायणी किंवा आंबेमोहोर असला तर सर्वात छान. लहान मूल  घरात असेल तर गुरगुट्या भात त्यास खाऊ घालण्यासाठी कितीही महागडा  बासमती असला तरी त्याचा उपयोग नाही, आंबोळीपिठासाठी  कणी असणे चांगले,  पुरणपोळी साठी कोणता गहू असावा, पीठ विकतचे असावे की स्वतः दळून आणलेले असावे, भाकरीसाठी किती ताजे पीठ असावे, थोडे जुने असले तर काय करावे, सुरळीची वडी करताना डाळ भाजून मग दळली असेल तर वडी होत नाही, पदार्थात लिंबू वापरताना घ्यायची काळजी,  पास्ता कमी किंवा जास्त शिजला तर चांगला लागत नाही, त्यासोबत वापरायच्या भाज्या ताज्या असायला हव्यात, शिजलेल्या ही हव्यात पण त्यातला क्रंच  गमवायचा नाही,  किंवा पदार्थ किंवा घरातील किराणा सामान जास्तीत जास्त चांगले आणि नीट कसे टिकवायचे, तूप कसे काढवायचे , वास न येता ते जास्त चांगले कसे राहू शकते, अगदी  विरजण लाऊन दही कसे बनवायचे  ते फळांचा स्वैपाकात वापर कसा करायचा,  दूध योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापरले तर पदार्थास श्रीमंत करेल पण मुळातच  त्यास  काळजीपूर्वक वापरायचे , जपून हाताळायचे असे एक ना अनेक ...
माणूस आपल्यातल्या स्वतःला त्या पदार्थाला देत असतो, जे बनवतो ते "दिल से" बनवावे लागते हे तर खरेच पण जी जगण्याची त्या व्यक्तीची रीत असते ती त्या स्वैपाकातही डोकावते किंवा ठळकपणे जाणवते. जसे मी नेहमी असा विचार करते की पैशाची श्रीमंती असेल किंवा नसेल पण माझ्या घरात जे आहे त्यात समृद्धी असेल, ती जाणवेल, जी माझ्या  विचारधारेतून दिसेल, माझ्या व्यक्तिमत्वात जाणवेल, माझ्या स्वैपाकात ठळकपणे उठून दिसेल. जगण्यात कोणते सुख दुःखाचे किंवा लौकिक श्रीमंतीचे प्रदर्शन नसेल, त्याचा हव्यास नसेल. मग तीच गोष्ट माझ्या स्वैपाकातही दिसते, जिथे ज्याची गरज आहे ते टाळणार नाही पण फक्त प्रदर्शन करायचे म्हणून कशाचा मारा करणार नाही. जसे की वनस्पती तूप म्हणून जे बाजारात मिळते ते घरात कधी औषधास ही सापडणार नाही. काजू शिवाय उपमा किंवा पुलाव बनणार नाही पण म्हणून मूठभर काजू किंवा बेदाणे कांदेपोहे बनवून किंवा कुळीथाचे पिठले बनवून त्यावर पसरून कोणास खाऊ घालणार नाही. दूध,सुकामेवा, केशर, चीज,  exotic  व्हेजिटेबल्स  किंवा ओला नारळ गरज असेल तर त्याचा वापर होईलच पण प्रदर्शन म्हणून कधीही नाही. पदार्थांच्या मूळ चवी मारल्या जाणार नाहीत, थोराघरले म्हणून सुकामेवा, केशर किंवा महाग असे घटक इतरांना मागे सारत स्वतः सतत पुढेपुढे करताना माझ्या स्वैपाकघरात दिसणार नाहीत आणि कोणता साधा सोपा किंवा स्वस्त म्हणून एखादा घटक मागे पडणार नाही. जे काही बनेल त्याने खाणारा तृप्त होणे आणि जी बनवते तिला बनवण्यातला आनंद मिळणे हे एकाच महत्त्वाचे बाकी सारे गौण ठरावे.
पदार्थ आधी माझ्या डोक्यात तयार होतो आणि मग तो प्रत्यक्षात साकारतो. त्यामुळे होते काय की एखादी कृती जी मुळात त्या पाककृतीचा भाग नाही असेही काहीसे डोक्यात येऊ शकते आणि वेगळ्या चवीचे काही बनू शकते. डोक्यात बनणाऱ्या पदार्थाचे रंग रूप मला नजरेसमोर दिसते इतकेच नाही तर त्याचा गंध ही मनात दरवळतो. मग त्याबरहुकूम तो पदार्थ बनवणे सोपे जात असेल कदाचित. अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर साधा शिरा करताना साजूक तुपावर रवा छान भाजून घ्यावा, त्यात केळे घालायचे असल्यास भाजताना घालावे म्हणजे ते काळे पडत नाही, रवा चांगला भाजून छान वास घरात पसरला, की उकळलेले दूध त्यावर घालून, हलवून एक वाफ आणावी, त्यात साखर घालून पुन्हा एक चांगली वाफ आणावी, आच बंद करण्यापूर्वी वेलची पूड घालून हलवून गॅस बंद करावा, ही झाली पारंपरिक कृती.
कधीतरी माझ्या डोक्याच्या प्रयोगशाळेत हा पदार्थ आला आणि त्यात थोडासा बदल होऊन त्याला थोडे वेगळेपण लाभले, मुळात चांगली असणाऱ्या चवीतली श्रीमंती वाढली. बदल काय घडला तर रव्यासोबत एक चमचा डाळीचे पीठ त्यात घातले आणि तुपावर भाजला, मध्ये केळ्याचे काप घालून ते भाजले आणि रवा भाजण्याची शेवटची तीन चार मिनिटे असताना थोडा किसून खवा त्यात घातला आणि मंद आचेवर हे मिश्रण भाजून पूर्ण केले, बाकी पुढची कृती बाकी तशीच. या एका छोट्या बदलाने झाले काय की चणा डाळीच्या पिठाने या पदार्थास अधिक खमंग बनवले आणि खव्याने अधिक चव समृद्ध!
हा बदल मग कायमसाठी माझ्या स्वैपाकाचा भाग बनला तो पदार्थ तसाच बनू लागला. शिरा हा एकच नाही तर असे अनेक पदार्थ थोडासा बदल करून माझे असे बनू लागले उदाहरणच द्यायचे झाले तर साधा फ्लॉवर मटार रस्सा दुधात शिजू लागला, ओल्या नारळाशिवाय कधी त्याची ग्रेव्ही बनली नाही, दुधी भोपळ्याची भाजी जी फारशी न आवडणारी पण पाण्याऐवजी दुधात शिजून नारळ कोथिंबीरीने चविष्ट वाटू लागली, पुलावला पुन्हा दूध केशराच्या स्वादात वेगळे रंग रूप गंध मिळू लागले, साधे भाजणीचे थालीपीठ करताना त्यात कधी थोडा भाजक्या पोहयाचा चिवडा बारीक करून घालून चविष्ट खमंग लागू लागले. न आवडणारी चवळीची उसळ पावभाजी मसाल्याच्या जोडीने स्वादिष्ट लागू लागली ... असे अनेक बदल डोक्यात आजही आहेत कधी साकारतील याची वाट बघत.

हे सारे कसे असते ना की गायकाने  एखादा  राग गाताना  त्यातले स्वर, कोणते कोमल कोणते तीव्र, कोणते निषिद्ध याचे भान ठेवायचे पण तरीही ते सारे सांभाळत एखादा स्वर असा काही लागावा कि त्याने त्या गाण्यास एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवावे, दर वेळी ते तसेच घडेल असे नाही.  पण एकदा वेगळा विचार करण्याची सवय लागली, आपण आपल्याशीच स्पर्धा करू लागलो आणि जे करत आहोत ते आपल्या आनंदासाठी करतो आहोत ते मनावर पक्के ठसले  की अनपेक्षितपणे  या प्रवाहात कोणता मोती हाती लागेल सांगता येत नाही. मुळात स्वयंपाक करणे ही प्रक्रियाच इतकी आनंददायी की काहीतरी छान फील गुड असे दरवेळी मिळतेच. कधी आपल्याकडून आपलेच शिक्षण घडते, कधी आपणच आपली पाठ थोपटून घेतो, कधी आपणच या प्रक्रियेतून काही मिळवणे असते. पण हा प्रवास मात्र नक्कीच आनंदयात्रा असते !

जेंव्हा मी स्वैपाकघरात असते तेंव्हा त्याची तुलना चित्रकार कॅनव्हास समोर असतो त्याच्याशी होऊ शकते. पदार्थ, त्याची कृती, त्याचे घटक आणि त्यात होऊ शकणारे बदल हा विचार अविरत डोक्यात चालू असतो. डोक्यात आकृतिबंध तयार असतो, अनेकदा एकाहून अधिक आकृतिबंध एकाच पदार्थाचे असू शकतात डोक्यात. फ्रीझमधून, डब्यांमधून एक एक पदार्थ ओट्यावर अवतरु लागतात, कॅनव्हासवर रंग येऊ लागतात तसे. त्यावेळी ओट्यावर खूप सारा पसारा असतो,  घटक पाण्याखाली धुतले जाणे, भिजवणे, वाटणे चिरणे, भाजणे, तळणे , उकळवून घेणे , शिजवणे अशा अनेक प्रक्रिया एकाच वेळी गरजेनुसार चालू असतात, वारंवार फ्रीज उघडताना किंवा डब्यांचे कपाट उघडताना मी दिसते, कारण कृती आणि यादी हे फिक्स डोक्यात असतेच असे नाही, आणि ऐनवेळी काय सुचेल हे ही सांगता येत नाही. शक्यतो पदार्थ बनवताना मी चव बघत नाही, तिखट, मीठ साखरेचे प्रमाण हे योग्य आहे किंवा नाही ते वासावरून कळते.  किंवा ज्याला हे बनवून खाऊ घालते त्याने पहिला घास घेतल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे उमटते त्यातून कळते. ही जी ओट्यापाशी कामात असताना असते असते ती खरी समाधी अवस्था म्हणू शकू. रूढ अर्थाने १० मिनिटे मेडिटेशन साठी बसून मनाला काबूत ठेवणे मला अनेकदा जमत नाही पण इथे मात्र ते घडते कसे ते माझ्याही नकळत.  माझे आसपास फारसे लक्षच नसते त्यावेळी . त्यामुळेच अनेकदा मला मध्ये कोणी मदत करू म्हंटले तर ते नको वाटते. लोकांना तो माझा उद्धटपणा किंवा माणुसघाणेपणा वाटतो ती गोष्ट वेगळी.  अनेकांनी मिळून करण्याची जी अशी कामे समजली जातात जसे की दिवाळीचे पदार्थ किंवा उन्हाळी साठवणीचे पदार्थ, जिथे अनेक जणी/जण गप्पा मारत काम करत असतात, ते तसे करणे माझ्यासाठी खूप कठीण असते, किंवा दोनच माणसे घरात असतो तेंव्हा, आणि कधीतरीच तो असा सोबत असतो म्हणून  त्याच्याशी  बोलत बोलत मी स्वयंपाक करताना फारशी दिसत नाही, एकदा मी ओट्यापाशी गेले कि आपोआप  मी वेगळ्या जगात जाते.  हळूहळू एखादा पदार्थ आकाराला येतो, एक पदार्थ किंवा पूर्ण स्वयंपाक पूर्ण बनला की मी माझ्या  या भावावस्थेतून हळूहळू बाहेर येते, ओटा मोकळा आणि स्वच्छ होऊ लागतो. मी या जगात परत येऊ लागते.
इथे या क्षणी माझा रोल संपतो किंवा माझा तो अवतार संपतो, अनेकदा ट्रान्समधून बाहेर आल्यासारखे मला वाटते. शांत वाटते, समाधानी  वाटत असते. तिथून पुढे जी माझी मी असते ती वेगळी असते, नेहमीची व्यक्ती असते , त्या प्रोसेसपासून वेगळी झालेली असते, त्यामुळेच कदाचित अनेकदा त्या पदार्थाचे कोणी कौतूक केले तर त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही, किंवा त्या कौतुकाची जबाबदारी वाटते, ते नकोसे वाटते असे नव्हे पण त्याची तीव्र अशी गरज नक्कीच नसते.  पुन्हा ह्याच दर्जाचे आपल्याकडून कायम बनले पाहिजे हा विचार मनात येतो. मुळात वर लिहिलेल्या अवस्थेतून गेल्यानंतर अशा कोणत्या कौतुकाची अभिलाषा ही फारशी नसते. जे हवे असते ते समाधान पदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेत पूर्णत्त्वाने मिळालेले असल्याने अजून काही मिळवण्याची आस उरत नाही. त्यातूनच मग मी कोणाला तो कसा झाला आहे हे विचारण्याचे ही फारसे कधी मला सुचत नाही. तो बनताना फोटो काढणे मला कधी सुचत नाही.
हा प्रवास आता माझ्या एकटीचा वाटत असला तरी तसा  तो नाही कारण मी ज्यांच्या कडून हे जे काही शिकले त्या साऱ्या जणींचा खूप मोठा वाटा त्यात आहे. बाहेर जेवताना हि चव, हे रंग, स्वाद कसे आणले असतील हा आपॊआप घडणार विचार असतो,  मला दुसरी एखादी व्यक्ती जेंव्हा स्वयंपाक बनवत असते तेंव्हा त्या व्यक्तीला पाहणे, तिच्या हालचाली टिपणे, त्यावेळचे चेहेर्यावरील भाव जाणून घेणे आवडते. अनेकदा असे इतर कोणाला काही बनवताना पाहून मी खूप काही शिकले ते अंगी बाणवले गेले. आजही रिकामा वेळ आहे आणि म्हणून टी व्ही बघणे घडणार असेल तर फूड चॅनेल्स ही माझी सर्वात पहिली पसंती असते. अनेकदा ते पदार्थ आपल्या जगाचा भाग नसतात, मी शाकाहारी असल्याने, मांसाहारी पदार्थ बनताना बघणे माझ्या फारसे उपयोगाचेही नसते पण म्हणून माझे शिकणे थांबत नाही .... त्यातला आनंद कमी होत नाही हे खरे!


No comments:

Post a Comment