Saturday, April 14, 2018

सपनोंकी नगरीसे भाग १

हजारो स्वप्ने मी मनात सोबत घेऊन फिरत असते. काही तात्कालिक असतात काही खोलवर जपलेली. त्यातली काही म्हणजे मला खाद्यपदार्थांच्या दुनियेत काहीतरी हटके करायचे आहे.  तसे पाहायला गेले तर माझ्या आत्याचा उज्ज्वला मराठे हिचा एक उत्तम सेट झालेला केटरींगचा व्यवसाय होता. उत्तम चव तिच्या स्वतःच्या हाताला आहे, व्यवसायासाठी पदार्थ बनवताना  दर्जात कोणतीही तडजोड ती करत नसे, त्यातूनच ती एक प्रस्थापित नाव बनली होती. तिलाच जॉईन करून हळूहळू तोच व्यवसाय पुढे चालू ठेवणे मला सहज शक्य होते. थोडासा प्रयत्न्न आम्ही दोघीनींही कदाचित केलाही होता. पण तेंव्हा कदाचित घर संसारात रमण्याची जास्त इच्छा होती, आणि सर्वात वाईट कदाचित हे होते कि असा व्यवसाय तुम्हाला सणावारी व्यस्त ठेवतो. ज्याची माझी तेंव्हा तरी कदाचित तयारी नव्हती. म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी घरी १५/२० माणसे जेवायला असताना, १०० एक मोदक बनवणे वेगळे, जे करायची माझी तयारी होती पण ते सोडून त्या दिवशी व्यवसायात गुंतून तिथे ५०० मोदकांची ऑर्डर आहे म्हणून भल्या पहाटेपासून राबणे मला बहुधा मान्य नव्हते. त्यामुळे तो प्रयत्न्न फार पुढे गेला नाही.

पुढे वेगळ्याच वाटेवरचे करिअर सुरु झाले. पण हे स्वप्न कधीही मनातून गेले नाही. असे म्हणतात की तुम्ही कितीही वाटा बदला तुमचे वाटे बदलत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपात हा धागा कायम सोबत असतो. त्यातूनच इन्फोसिस मध्ये  फूडकोर्ट मधील सँडविच बनवणाऱ्याला ते बनवायला शिकवणे, कलिग्जना रेसिपी सांगणे, केपीआयटी मधल्या कॅन्टीन वाल्याने बनवलेले थालीपीठ खाऊन " अरे बाबा, एखाद्या महाराष्ट्रीयन माणसाकडून आधी बनवायला शिक, किंवा शेवभाजी एखाद्या खान्देशी हॉटेल मधली खाऊन ये नाही तर मला विचार कशी बनवायची ते " असे सांगणे असे मजेशीर प्रकार सतत घडत असतात. दर काही दिवसांनी आपण पॉटलक पार्टी करूया असे टीम ला म्हणणारी ही मीच असते. अनेकदा कॅन्टीन मध्ये बनणारे पदार्थ परफेक्ट चवीचे नसतात, काही तरी कमी, काही तरी जास्त असतेच, तेंव्हा मनात विचार येतो तिथे फूड टेस्टर म्हणून आपण काम करावे.
एकेकाळी मॅकडॉनल्ड चे आउटलेट सुरु करायचे स्वप्न होते, कधी मला ऑफिसच्या फूड कोर्ट मध्ये सूप्स अँड सलाड बार सुरु करायचे स्वप्न असते, आज अनेक आऊटलेट्स पुणे, ठाणे डोंबिवली अशा ठिकाणी दिसतात जी महाराष्ट्रीयन पदार्थ उत्तमरीत्या बनवून खाऊ घालतील. सुरुवातीला जेंव्हा उसळ भाकरी किंवा पिठले भाकरी एवढीच त्यांची कक्षा होती तेंव्हा मला असे काहीसे सुरु करून त्यात डाळ ढोकळी, फोडणीचा भात, फोडणीची पोळी आणि सोबत मसाला ताक, उत्तम चवीचा मसालेभात आणि अळूची भाजी, सांज्याची पोळी, तांदळाची उकड, आंबोळी  असे थोडे हटके पदार्थ तिथे ठेवण्याचे स्वप्न होते.

अजूनही मनात इच्छा आहे फक्त पुरणपोळी आणि मोदक बनवून देण्याचा व्यवसाय सुरु करण्याची , अगदी असे पदार्थ बनवून देणाऱ्या अनेक जणी आसपास असूनही. हाताची चव आणि सोबत राखलेला दर्जा ह्याचे सार्वत्रीकरण होऊ शकत नाही.
अलीकडेच दोन विचार मनात घोळत आहेत. पहिला म्हणजे आता काळानुरूप आसपास वृद्धांची संख्या वाढत जाणार, त्यांचे एकटेपण, सोबत कोणी नसणे हे सारे वाढत जाणार पर्यायाने वृद्धाश्रमांची संख्या ही वाढणार. माणसे अडगळीत टाकल्यासारखे हे वृद्धाश्रम नसू नयेत हे कोणालाही सहजच वाटेल. असा एखादा वृद्धाश्रम असेल जिथे सारी नीट व्यवस्था असेल. त्यांच्या खाण्यापिण्याची नीट सोय असेल. असा विचार मनात येतो की शेवटी तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय बघणारी, ते बनवणारी ठराविक माणसे असतील, तेच तेच ठराविक पदार्थ बनवून दिले जात असतील. साधारण तीच चव बनत असेल. या माणसांना सुट्टी देणे हा ही एक त्या व्यवस्थापनापुढील प्रश्न असत असेल कारण सगळे एका वेळी सुट्टीवर जाऊ शकत नसतील, सणावारी हा प्रश्न जास्त मोठा बनत असेल.
मनात विचार आला तो हा की का एखाद्या वृध्दाश्रमाशी मी जोडली जाऊ नये. आठवड्यातून एक दिवस तिथे जावे, त्यांना वेळ द्यावा, पुस्तक वाचून दाखवावे, गप्पा माराव्यात. हळू हळू एक कंफर्ट निर्माण झाला की स्वतः घरी बनवून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जावे. किंवा  तेथील स्वयंपाक घरातील माणसांना सुट्टी द्यायला सांगून आपल्याला तेथील कोणीतरी मदतीस घेऊन आपणच त्यांच्यासाठी काहीसे वेगळे पण त्या मंडळींना चालेल असे जेवण बनवावे.
जिथे ३६५ दिवस दिवसाचे तीन किंवा चार वेळेचे खाणे मोठ्या प्रमाणात बनते तिथे वेगळे काही बनणे थोडे कठीण असत असावे अशी माझी कल्पना आहे. परवा ऑफिस टीम साठी कैरीची डाळ आणि पन्हे बनवून नेताना मनात आलेला हा विचार आहे. कि  एखाद्या चैत्रातील रविवारी मी अशा एखाद्या ठिकाणी जाऊन दुपारी त्यांच्या साठी असे डाळ -पन्हे का बनवू नये, आणि ते खाऊन तृप्त त्यांना होताना पाहू नये. मग हे विचार पुढे वाढतच गेले आणि सदर पदार्थांची यादी ही. 

आज तरी हे स्वप्न आहे कारण दिवसाचे १० तास ऑफिसला जाणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर आपले वृद्धाश्रमाचे स्वयंपाकघर काही काळ का होईना कोण ताब्यात देईल मला माहीत नाही. पण स्वप्न तर बघायलाच हवीत तेंव्हा ती पुरीही होतील एक ना एक दिवस हे खरे ना?

पौष्टिक लाडू

अनेकदा मी पोहे, डाळे, डिंक आणि थोडे पिस्ते व बदाम ह्याचे लाडू बनवते. कसे तर पोहे व डाळे  कोरडे भाजून पूड करणे, डिंक थोड्या तुपात तळून घेणे. बदाम आणि पिस्ते यांची पावडर करून घेणे, हे सारे एकत्र करून, त्यात वेलचीपूड, गरजे नुसार थोडे तूप आणि पिठीसाखर घालून लाडू वळून ठेवणे.
आज लाडू बनवणे मनात होते, साधारण असेच काहीसे डोक्यात ही होते पण तरीही करावयास घेई पर्यंत नक्की होत नव्हते. शेवटी जे बनले ते असे -

प्रत्येकी एक वाटी पोहे आणि डाळे तळून घेतले.
२५ ग्रॅम डिंक तळून घेतला.
२ चमचे मेथ्या तळून घेतल्या.
४ चमचे खसखस भाजून घेतली.
अर्धी वाटी खारीक पूड अगदी बारीक केलेली घेतली.
अर्धी वाटी मुगाचे पीठ तुपात चांगले भाजून घेतले.

तळून घेतलेल्या सर्व गोष्टी गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतल्या. मुगाचे भाजलेले पीठ गार होऊ दिले. त्यात सर्व बारीक करून घेतलेले जिन्नस घालून मिसळून घेतले, वेलचीपूड घातली आणि लाडू वळले. हे सारे करताना जे जसे डोक्यात आले तसे करत गेले त्यामुळे तयार लाडवांखेरीज कशाचाही फोटो नाही. पदार्थ करताना अनेकदा एकच विचार डोक्यात असतो तो म्हणजे याचे आहारमूल्य कसे वाढवता येईल. अर्थातच ओट्यावर कोणते आहारशास्त्रावरचे पुस्तक लागत नाही आणि तसे नसतेही. पण डोक्यात काही सूत्रे असतात. कॅल्शिअम, प्रोटिन्स याचा विचार सतत असतो. मला स्वतःला गोड पदार्थ आवडतात. माझ्या माणसांनाही आणि नशिबाने तरी अजून ते खाण्यावर निर्बंध घालावे ही वेळ आलेली नाही एक वजनाचा काटा जे दर्शवितो त्या खेरीज. याखेरीज माझी स्वतःची फार तीव्र चवी नसलेले पदार्थ हि एकच आवड आहे. त्यामुळे बऱ्याचदा साधे सोपे सात्विक आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याकडे कल असतो.

आता बघुयात हे जे लाडू बनले त्यांचे पोषण दृष्ट्या मूल्य कितपत चांगले आहे ते.
खारीक आणि डिंक हे स्नायू आणि हाडांचे पोषण करतात. डिंक कॅल्शिअम चा पुरवठा करते. हाडे आणि सांधे याकरिता डिंक आणि खारीक दोन्ही उत्तम.
डाळे आणि मुगाचे पीठ प्रोटिन्स चा चांगला पुरवठा करतात.
मेथ्या नको असलेले कॅलेस्टरॉल कमी करतात तसेच पचनास मदत करतात. तळून त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो.
पोहे पचायला हलके आणि कार्बोहैड्रेट्स चा स्रोत.
खसखस त्वचा आणि हाडांसाठी चांगली.
यात साखरेऐवजी गूळ वापरावा का हा विचार होता कारण अनेकदा डिंक लाडू बनवताना मी गूळ वापरते पण यावेळी कसे लागतील असा प्रश्न पडला आणि म्हणून पिठीसाखर वापरणे मी पसंत केले.
जेवढे तूप मुगाचे पीठ भाजण्यासाठी आणि इतर जिन्नस टाळण्यासाठी वापरले (१०/१२ चमचे)  त्याहून अधिक तूप वापरण्याची गरज लागली नाही. वरील साहित्यात असे २० लाडू बनतात.
सकाळी एक लाडू आणि एक ग्लास दूध ही उत्तम न्याहारी असू शकते.

Thursday, April 5, 2018

टोमॅटोची चटणी : (पंच फोरन )

साहित्य : तीन मध्यम आकाराचे छान लाल पण घट्ट टोमॅटो, पाव  चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा बडीशेप, एक मूठ बेदाणे मध्ये चिरून, ३ तिखट लाल मिरच्या, २ पाने तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी, २ चमचे तेल, मीठ

कृती : टोमॅटो धुऊन कोरडे करून बारीक चिरून घ्या.

फोडणीचे सर्व साहित्य काढून ठेवा

बेदाणे चिरून ठेवा
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या
त्यात मेथीदाणे , बडीशेप, दालचिनी , तमालपत्र आणि लाल मिरच्या या क्रमाने घालून फोडणी करून घ्या.
बेदाणे घालून थोडे परतून घ्या.


चिरलेला टोमॅटो घालून झाकण ठेवून कमी आचेवर एक वाफ येऊ द्यात.

पुन्हा परतून त्यात मीठ घाला, हवी असल्यास थोडी साखर घाला. (बेदाण्यामुळे गोड चव आधीच आलेली असते)
पाणी सुटेल, परतून ते आटू द्यात.
चटणी किंवा भाजी म्हणून खाता येते. मेथी, बटाट्याच्या किंवा कोणत्याची पराठ्यासोबत जास्त चांगली लागते.

लागणारा वेळ : २० मिनिटे
२/३ व्यक्तींसाठी 

Thursday, March 29, 2018

जुन्या पानावरुन काही भाग ४ -फसलेला.....नाही, नाही, जमलेला प्रयोग!

स्वयंपाक करू लागण्याचे नवीन दिवस होते ते. एका सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी घरचे बाकी ३ मेम्बर्स बाहेर आणि मी एकटी घरी. आपोआप रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझी. नेहमीचा स्वयंपाक विशेष येत नव्हता तरी, छोले-पुरी, पावभाजी, आलूपराठे, रगडापुरी, चाट, इडली, डोसे असे पदार्थ मला करता येत असत. पण तेच तेच किती वेळा करून खावू घालणार ना? म्हणून नेहमीचा स्वयंपाक करण्याचे ठरविले. भात, फुलके, भाजी आणि कोशिंबीर. यात फार काही प्रॉब्लेम नव्हता. प्रश्न होता तो आमटीचा. घरात बाकी तिघाना चिंच-गुळ घालून केलेली कांद्याची आमटी खूप आवडते. ("आमटी कशी अमृततुल्य चवीची हवी!". पण मला तशी आमटी अजिबात आवडत नाही. काहीतरी प्रयोग करणे भाग होते. 
 
शेवटी डाळ भाताचा कुकर लावला आणि फ्रीज उघडला. मिरची, कोथिंबीर, ओला नारळ होताच. लक्ष गेला दरवाज्याच्या कप्प्यात असलेल्या मसाल्यांच्या डब्यांकडे. म्हटलं करू काहीतरी. डाळीची कांदा, चिंच गुळ, थोडी धनाजीरा पावडर घालून आमटी करून घेतली, उकळी आल्यावर त्यात थोडा थोडा मसाला घालत गेले. पावभाजीचा, छोल्यांचा, राजवाडी,बिर्याणीचा. नारळ कोथिंबीर घालून आमटी तयार!! इतका मस्त वास दरवळत होता घरात! तरीही डोक्यातले, यात अजून काय करता येईल याचे विचार थांबले नव्हते.

 
नवरा बाहेरून आल्या आल्या त्याने विचारले " काय बेत आहे? मस्त वास येत आहेत किचन मधून?" म्हटलं थांब आणि बघ. जेवायची पाने घेता घेता, छोट्या कढल्यात साजूक तूप गरम करत ठेवले, त्यात, पुन्हा जिरे, कढीपत्ता आणि २/३ लाल मिरच्या घालून फोडणी केली आणि आमटी वर ओतली. आहा...काही तरी मस्त रेसिपी जमून आली आहे याची खात्री पटली. जेवताना सगळ्यांनाच ती खूप आवडली. काय विशेष/ वेगळे केले आहे असं विचारल्यावर सांगून टाकलं कोणकोणते मसाले घातले ते. त्यावर माझे सासरे म्हणाले " नशीब! तो चहाचा मसाला तुझ्या तावडीतून सुटला!"............आणि यावर एकाच हास्यकल्लोळ झाला.





जुन्या पानावरुन काही भाग ३ - कुछ मीठा हो जाये ....

Wednesday, July 4, 2012
पूर्वी कधीतरी म्हंटल्याप्रमाणे खाणे आणि करून खाऊ घालणे या दोन्ही गोष्टी मी अगदी मनापासून करते, अगदी "दिलसे" ! त्याच प्रमाणे अजून एक त्यासंबंधी गोष्ट आवडते ते म्हणजे खाण्यावर बोलणे. माझ्या यापूर्वीच्या ऑफिस मध्ये एक मैत्रीण होती जी माझं हे खाण्यावरच बोलणं आनंदाने ऐकत असे आणि नंतर म्हणे " चल, फूड-कोर्ट मध्ये जाऊ, तुला भूक लागलीये". अजून एका मैत्रीणीला मला चिडवायला खूप आवडत असे, मग दर वेळी माझ्या डब्यातले खाताना, "तुझ्या स्वैपाकाच्या बाईंना सांग " पदार्थ छान झाला होता" असे म्हणून मला चिडवत असे आणि मग मी पण हो त्यांनीच केलाय असा तिला सांगत असे. एखादा आवडता पदार्थ म्हणजे मी त्याच्या रंग, रूप, स्वाद, सुवास याने वेडी होऊन जाते. या साऱ्या गोष्टी मग खूप वेळ मनात घर करून राहतात. कधी काही पदार्थांची मला आठवण होऊ लागते आणि जणू ते पदार्थ समोर आहेत, किंवा त्यांचा सुवास घरभर पसरला आहे असं वाटायला लागतं, असं घडायला लागलं की मग तो पदार्थ बनवावाच लागतो. अशा पदार्थांची माझी लिस्ट ही खूप मोठी आहे. उदा. गव्हाचा चीक, कणसाचा उपमा, गार्लिक ब्रेंड, किंवा पिझ्झा, व्हेज ऑग्रटीन, हळदीच्या पानावर केलेले काकडीच्या रसातले पानगे, नारळ, खवा घालून केलेले रव्याचे लाडू, उकडीचे मोदक करताना शेवटी बनवलेल्या निवगऱ्या, नारळाच्या दुधासोबत फणसाची सांदणे, पाकातल्या पुऱ्या, तांदळाच्या ओल्या फेण्या, फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ किंवा त्याची गरम मसाल्याची आमटी, दुधी हलवा, खरवस असे एक ना दोन .......

काही पदार्थांची काही खास कनेक्शन्स असतात, की एक पदार्थ समोर दिसला की हमखास दुसऱ्याची आठवण होतेच. जसे की, लोणी कढवायला ठेवले, आणि तूप होत आले, की त्या तुपाचाच नव्हे तर तव्यावरच्या पुरणपोळीचा दरवळ मला जाणवायला लागतो, आणि तेंव्हाच नाही फक्त तर नंतर चे २/३ दिवस जेंव्हा जेंव्हा त्या साजूक तुपाचा डबा उघडते, तेंव्हा तीच आठवण होते. पुरणपोळी ही कशी तर, एक बाजू भाजून उलटली, की मग भाजलेल्या बाजूवर लिंबाचा रस पसरवायचा, त्यावर एक पिठीसाखरेचा थर द्यायचा, आणि नंतर त्यावर तुपाची धार! तो पर्यंत दुसरी बाजू ही भाजून झालेलीच असते. पोळी तव्यावरून ताटात अलगदपणे, अगदी उलथने वगैरे सुद्धा लावायचे नाही तिला आणि अशी मऊसूत की प्रत्येक घास जणू विरघळत गेला पाहिजे! आहा हा .....सुख सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं असू नाही शकत.

आंब्याचा सीझन आला की नुसती आमरस पोळी/पुरी खाण्यात मजा नाही. एकदा तरी पुरणपोळी तेंव्हा बनली पाहिजे घरी, हापूसचा रस आणि गरम तव्यावरची पुरणपोळी!!! या सीझन मध्ये एखाद्या सुट्टीच्या दिवशी सकाळीच आंब्याचा रस काढून त्यात मिरपूड, मीठ घालून फ्रीज मध्ये गार करत ठेवायचा. जेवणात गरम फुलके, आमरस, बटाट्याची भाजी आणि सर्वात कळस म्हणजे गरम वाफाळता भात त्यावर तूप आणि वरण/आमटीच्या ऐवजी फक्त आमरस!!! सुट्टीच्या दिवशी यापेक्षा सुंदर जेवण नाही असू शकत!

धो धो कोसळत्या पावसाचा आणि आपल्या सुट्टीचा दिवस. सकाळी आरामात उठावे, लागोपाठ २/३ कप आले, गवती चहा घालून बनवलेला चहा पीत घरी येणारे सगळे पेपर त्यांच्या पुरवण्यांसह आरामात वाचून संपवायचे. नाश्त्याला मस्त पैकी बटाटेवडे, लसणाच्या चटणीसह, आणि अगदी सत्यनारायणाच्या प्रसादाला बनवतो तसा मस्त शिरा. असा नाश्ता झाला की मग बाकी काही करू नाही शकत आपण. दुलई घ्यायची, एखादं आवडेल असं पुस्तक आणि आपण बस्स..... एखाद्या संध्याकाळी, साधं पण छान जेवायचा मूड असेल तर मग पुलाव, मक्याच्या कणसांची नारळाच्या दुधात बनवलेली करी आणि बटाट्याचा पापड!
लक्षात येतंय का तुमच्या किती बोलतीये मी खाण्याबद्दल! खरंच खूप भूक लागलीये......काहीतरी खाऊन येते तोपर्यंत तुम्ही आज वरील पैकी काय बनवायचे ते  ठरवा  बरं.