Sunday, June 30, 2019

किनोवा - नाचणी डोसा

किनोवा - नाचणी डोसा

सुपर फूड म्हणून सध्या जगभर ज्याचा उदो उदो होत आहे तो किनोवा. त्याची किंमत बघूनच खरे तर मला धडकी भरली होती. तरीही या वर्षी दिवाळीत भावाकडून आलेल्या एका गिफ्ट पार्सल मध्ये किनोवा होता, ग्रीन टी आणि काही ड्रायफ्रूटस होते. इतके दिवस असेच गेले, किनोवाचे नक्की काय करावे या विचारात....अनेक रेसिपीज शोधून वाचून झाल्या होत्या मधल्या काळात, पण मुहूर्त काही लागेना!
काल अचानक सुचले.....
एक मूठ किनोवा, एक मूठ मूग डाळ, एक मूठ उडीद डाळ आणि एक मूठ तांदूळ भिजवून ठेवले. ५/६ तासांनी पाणी न घालता मिक्सर मधून वाटून घेतले. वाटतानाच त्यात एक वाटी नाचणीचे पीठ घातले. 
रात्रभर उबदार जागी ठेवून सकाळी मीठ घालून सारखे करून त्याचे झटपट डोसे घालून चटणी सोबत सुंदर नाश्ता बनला.



यात...
 मूग आणि उडीद डाळ असल्याने प्रोटिन्स आहेत.
किनोवा हे ग्लूटेन फ्री प्रथिनांचा स्रोत आहे. 
नाचणी लोह आणि कॅल्शियम चा चांगला स्रोत आहे. 
#health bhi taste bhi

Friday, February 15, 2019

कटाची आमटी


कटाची आमटी

साहित्य: पुरणाची डाळ शिजवून बाजूला काढून ठेवलेले पाणी, पुरण वाटताना शेवटी पुरणयंत्रात उरलेले पुरण, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, बडी इलायची २, एक इंच दालचिनी तुकडा, २ तमालपत्र, २ चिमूट मेथी दाणे, २ चिमूट बडीशेप, सुक्या लाल मिरच्या ४, हिरव्या मिरच्या २/३, कढीपत्ता, मीठ, छोटी वेलची सालासकट, ४ चमचे चिंचेचा कोळ
कृती:
v  डाळीचे पाणी साधारण अर्धे भांडे असेल तर त्यात एका मोठ्या पुरणाचा गोळा घालून सारखे करून घ्यावे. (पुरण यंत्रात वर शेवटी उरलेले आणि थोडे वाटलेले असे सर्व मिळून) जरुरी नुसार थोडे पाणी घालावे. त्यात मीठ आणि चिंचेचा कोळ घालून घ्यावा.
v  एका छोट्या कढईत तेल गरम करून मोहरी हिंग आणि इतर सर्व मसाल्याचे साहित्य घालून मंद आचेवर फोडणी करून घ्या आणि ते ह्या डाळीच्या पाण्यात घालून एक चांगली उकळी येऊ द्या.
v  ही आमटी मुरलेली जास्त चांगली लागते.
v  जास्त तिखट होऊ द्यायची नसल्यास उकळी आल्या नंतर सर्व मिरच्या काढून टाकाव्यात. गरम मसाल्याची चव उतरत मुरू द्यावी.

पुरण पोळी


पुरण पोळी

साहित्य: पुराणासाठी -  २ फुलपात्री हरबरा डाळ, २ फुलपात्री चिरलेला गूळ, १ वाटी साखर, १ चमचा तेल, पाव चमचा हळद, अर्धा चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड, पुरणयंत्र
बाहेरील आवरण: १ फुलपात्र कणिक, अर्धी वाटी मैदा, चिमूट भर मीठ, एक चिमूट हळद, तेल आणि पाणी, मलमल चे स्वच्छ धुतलेले कापड पूर्ण पोळपाटाला बांधले जाईल इतके
पोळी लाटण्यासाठी मैदा
कृती:
v  डाळ धुवून कुकर मावेल अशा मोठ्या पातेल्यात घेऊन त्यात दुप्पट पाणी, हळद आणि तेल घालून कुकर मध्ये ५/६ शिट्ट्या झाल्यानंतर ५/१० मिनिटे आचेवर डाळ शिजवून घ्यावी.
v  हे पाणी कटाच्या आमटीसाठी वापरतात.
v  झाकण निघाल्यानंतर पाणी काढून डाळ निथळून घ्यावी.
v  कोमट झाल्यावर त्यात साखर आणि गूळ घालून मोठ्या कढईत शिजवण्यास ठेवावे. सतत हलवत राहावे.
v  साधारण अर्धा तास लागेल पुरण शिजण्यास.
v  उलथणे उभे राहिले म्हणजे पुरण शिजले.
v  गॅस बंद करून त्यात वेलची आणि जायफळ पूड घालून मिसळून घ्यावे.
v  गरम असतानाच पुरणयंत्रातून बारीक जाळी लावून वाटून घ्यावे. जसजसे गार होईल तसे वाटणे थोडे जड जाते.
v  गार होऊ द्या आणि साधारण मोठ्या मुठी इतके गोळे करून ठेवा.

v  एक वाटी मैदा आणि १ फुलपात्र कणिक एकत्र करा त्यात मीठ आणि हळद घालून बारीक चाळणीतून ३ वेळा चाळून घ्या.
v  तसेच पोळी लाटण्यासाठी लागणारा मैदा अंदाजे प्रमाणात घेऊन असाच चाळून बाजूला ठेवा.
v  परातीत चाललेला मैदा आणि कणिक घेऊन थोडे तेल आणि थोडे पाणी घालत सैल आणि मऊसूत भिजवून घ्या. हे काम हळूहळू करायचे आहे एकदा थोडे तेल मग थोडे पाणी घालत ही कणिक  भिजवून घ्यायची आहे. एका भांड्यात ही कणिक ठेवून ती पूर्ण भिजेल इतके तेल त्यावर घालून झाकण ठेवून तासभर मुरत ठेवायची आहे.

v  पुरण पोळी करण्यापूर्वी:
v  पोळपाटास मलमलचे कापड पूर्ण बांधून खाली गाठी मारून ठेवा.
v  ओटा वर्तमानपत्राने झाकून घ्या.
v  एक मऊ रुमाल हाताशी ठेवा पोळीची जास्तीची पिठी हलक्या हाताने या रुमालाने काढता यायला हवी.
v  एक जाड सपाट तवा पोळी भाजण्यासाठी ठेवावा.

v  कणकेत असलेले जास्तीचे तेल काढून ठेवावे.
v  तवा गरम करत ठेवा. पुरण पोळी करताना एकसारखी मध्यम आच ठेवायची. सतत कमी जास्त करायची नाही.

v  प्रत्येक पोळीसाठी एका छोट्या लिंबाइतकी कणिक घ्या.
v  पोळीला लावण्यासाठी चालून ठेवलेल्या मैद्यात एका बाजूने बुडवून घेऊन तो डाव्या हातात ठेवा.
v  उजव्या हातात पुराणाचा गोळा घेऊन दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरवत हा उंडा तयार करून घ्यावा.
v  हलक्या हाताने त्याचे तोंड बंद करावे आणि तो चपटा करून पिठीत सर्व बाजूने बुडवून घ्यावा.
v  तयार केलेल्या पोळपाटास मैदा लावून घ्यावा.
v  त्यावर हा पिठी लावलेला उंडा ठेऊन थोडे थापून घ्या.
v  नंतर त्यावर लाटणे हलक्या हाताने फिरवत पोळी लाटून घ्यावी.
v  पोळपाट उचलून पोळी एका वर्तमानपत्राच्या जाड तुकड्यावर उलटून घ्यावी.
v  हलक्या हाताने खाली लागलेली जास्तीची पिठी काढून टाकावी आणि पोळी तव्यावर टाकावी.
v  साधारण एका बाजूने भाजली गेली कि तवा गॅस वरून काढून वर्तमानपत्राच्या तुकड्यावर तवा तिरका करून काढून घ्यावी.
v  वर्तमानपत्र उचलून पुन्हा दुसरी बाजू तव्यावर भाजण्यास टाकावी.
v  दुसरी बाजू भाजली गेली की पुन्हा तवा गॅस वरून उचलून तिरका करून एका मोठ्या वर्तमानपत्रावर गार होण्यास ठेवावी किंवा साजूक तुपासोबत गरम गरम वाढावी.

§  ह्या पोळीला उलथणे लावायचे नाही.
§  अतिशय नाजूक आणि मऊसूत असते त्यामुळे खूप जपून हाताळावी लागते.
§  साधारणपणे ५/७ दिवस टिकते. यात साधारणपणे २० पोळ्या होतात.


Thursday, February 14, 2019

गुळाची पोळी


गुळाची पोळी

साहित्य: अर्धा किलो बारीक किसलेला गूळ, अर्धी वाटी तीळ - भाजून पावडर करून, चार चमचे खसखस भाजून पावडर करून ५/६ चमचे तेल, ४ चमचे चणा डाळीचे पीठ, अर्धा चमचा वेलची पूड, एका हरबऱ्या इतका ओला खाण्याचा चुना.

वरची पारी: १ भांडे कणिक, एक भांडे मैदा, एक चिमूट मीठ, ४ चमचे तेल. पोळी लाटण्यासाठी थोडा मैदा

कृती:

v  गूळ किसून घ्यावा.
v  तीळ आणि खसखस भाजून बारीक पावडर करून घ्यावी आणि गुळात मिसळावी.
v  तेल तापवून त्यात डाळीचे पीठ घालून खरपूस भाजून घ्यावे.
v  हे मिश्रण गरम असतानाच गुळावर घालून चमच्याने हलवून घ्यावे.
v  गार झाल्यावर त्यात खाण्याचा चुना आणि वेलची पूड घालून चांगले मळून मोठ्या लिंबातून थोडे मोठे गोळे करून ठेवावे.
v  कणिक आणि मैदा एकत्र करून घ्यावा. मीठ घालावे.
v  तेल गरम करवून कणकेत घालून ते सर्व कणकेला चोळून घ्यावे.
v  त्यात जरुरी प्रमाणे पाणी घालून घट्ट भिजवून सुमारे अर्धा तास ठेवावी.
v  कणकेचे प्रत्येक पोळीसाठी दोन छोटे गोळे करावेत.
v  एक साधारण गूळ इतका आणि एक त्याहून थोडा लहान.
v  त्याच्या छोट्या लाट्या लाटून घ्या. एक लहान एक मोठी.
v  मोठ्या पारी वर गुळाची गोळी चपटी करून त्यावर ठेवावी आणि त्यावर लहान पारी ठेवून कडेने सगळ्या बाजूने बंद करून घ्या.
v  थोडया मैद्यावर पोळी पातळ लाटून घ्या.
v  नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

§  चुन्यामुळे गूळ पोळीच्या बाहेर येत नाही.
§  पोळी खुटखुटीत कडक झाली पाहिजे.
§  कणिक घट्ट भिजवली गेली नाही तर पोळी मऊ पडेल आणि त्याचे तुकडे पडतील.
§  या पोळ्या साधारण आठ दिवस टिकतात.

Tuesday, February 12, 2019

दुधी हलवा

         
दुधी हलवा:

साहित्य: १ मध्यम आकाराचा कोवळा दुधी, पाव किलो खवा, २ वाट्या साखर, ड्राय फ्रुटस बारीक तुकडे करून, पाव चमचा वेलची पूड, ७/१० काड्या केशर, २ चमचे साजूक तूप

कृती:
v  दुधी धुवून त्याचे ४ इंचाचे मध्ये चिरून चार भागात तुकडे करून घ्या.
v  कोवळ्या दुधी मध्ये बिया फारशा असणार नाहीत.
v  एका भांड्यात पाणी ठेवून त्यावर किसणी ठेवून दुधी किसून घ्या. साले टाकून द्यायची.
v  पाण्यात ठेवून किसला की दुधी काळा पडत नाही.
v  एका जाड पॅन मध्ये खवा मंद आचेवर भाजून घ्या रंग न बदलता पण त्याचे तूप सुटले पाहिजे.
v  खवा पॅन मध्ये काढून घ्या.
v  पॅन मध्ये असलेल्या तुपात ड्राय फ्रुटस तळून घ्या.
v  त्यावर किसलेला दुधी घट्ट पाणी काढून टाका
v  परतून घ्या, ते तूप कमी वाटले तर अजून २ चमचे तूप घालून परता.
v  ३/४ मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊद्या.
v  त्यात खवा आणि साखर घालून नीट शिजू द्या.
v  साधारण झाकण ठेवून १० मिनिटात हलवा शिजेल.
v  केशर आणि वेलची घाला.
v  गार झाल्यावर हलवा अजून थोडा घट्ट होईल त्या हिशेबाने थोडा पातळ वाटला तरी गॅस बंद करून गार होऊ द्या.
v  फ्रीझ मध्ये गार करून सर्व्ह करा.

Monday, February 11, 2019

महाराष्ट्रीयन पाककृती -श्रीखंड

कधीतरी कोणीतरी एखादी रेसिपी विचारते, आपण सहजगत्या  सांगतो. कधीतरी कोणीतरी दाद देते की  तू तर इतरांना स्वैपाक शिकवायला हवास. आपण हसून विचार मागे टाकतो. मग कधीतरी कोणीतरी मागेच लागते की तुझ्या रेसिपीज लिहून पाठव. थोडेसे व्हाट्स ऍप च्या माध्यमातून चटकन जमतील तेवढ्या शेअर करतो.

पण वारंवार मला पडतो तो प्रश्न हा की विविध खाद्य पद्धतींवर हजारो पुस्तके बाजारात असताना, गूगलच्या माहिती जालात हवी माहिती एका क्लीकसरशी उपलब्ध असताना आपण काही का लिहावे? आणि कोणी ते का वाचावे?
काय नक्की वेगळे आपण देऊ शकतो? नक्की कोणत्या आपल्या अशा हातखंडा पाककृती असू शकतात? पुन्हा पुन्हा करून त्या सिद्ध झालेल्या असायला हव्यात. साधारण स्वैपाक येणाऱ्या कोणालाही सहज ती जशी तशी करता यायला हवी. त्यातल्या खुबी आणि सूचना नीट पोचवता यायला हव्यात. हा विचार मनात ठेवून ज्या थोड्या फार लिहिल्या गेल्या त्या काही आता  ब्लॉगवर ठेवत आहे.

या सर्व च्या सर्व महाराष्ट्रीयन त्यातूनही पुण्या- मुंबई कडे बनणाऱ्या, थोड्या कोकणी वळणाच्या, मुक्त हस्ते नारळाचा वापर सुचवणाऱ्या, चिंच गूळ आमसूल वापरून बनवलेल्या.
नेहमीप्रमाणे पाककृती बनवताना फोटो काढणे राहून जाते. ही त्रुटी हळूहळू दूर करेन. या रेसिपीज करून मला तुमचा अनुभव नक्की सांगा.

श्रीखंड

साहित्य : २ लिटर फुल क्रीम दूध , अर्धा किलो साखर, जायफळ वेलची केशर २ चमचे दूध, २ चमचे दही, बदाम आणि पिस्ता काप (आवडीनुसार ), एक चिमूट मीठ

कृती :
v  दूध कोमट करून घ्यावे. पूर्ण तापवू नये, साय येता कामा नये.
v  त्यास २ चमचे घट्ट दह्याने विरजण लावावे.
v  झाकून उबदार जागी ठेवून द्यावे. थंडीत जास्त काळजी घ्यावी.
v  उन्हाळ्यात साधारण ४ ते ५ तासात नीट विरजण लागून घट्ट दही बनते तर थंडीत साधारण ८ तास लागू शकतात.
v  कोणत्याही कारणाने दही आंबट होता काम नये.
v  दही एका कोरड्या आणि स्वच्छ मलमल च्या कापडात बांधून टांगून ठेवता येईल अशी पोटली बांधावी आणि खाली पाणी जमा होत राहील अशी व्यवस्था करून टांगून ठेवावे. साधारण तास भर असे ठेवल्यावर बरेचसे दह्यातील पाणी निघून जाईल.
v  नंतर ही पोटली एका चाळणीत ठेवून ती चाळणी एका पातेल्यावर ठेवावी आणि हे सारे फ्रीझ मध्ये ठेवावे. म्हणजे चक्का आंबट होणार नाही.
v  साधारण ४ ते ५ तासात पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि घट्ट चक्का तयार होतो.
v  ह्या चक्क्यात साखर मिसळून ठेवावी.
v  अर्ध्या ते एक तासाने, हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे.
v  केशर काड्या २ चमचे कोमट दुधात भिजवून या श्रीखंडात घालाव्यात.
v  एक चिमूट मीठ , पाव चमचा वेलची पूड आणि थोडे जायफळ किसून घालावे.
v  सारखे करून फ्रीझ मध्ये ठेवून गार सर्व्ह करावे.
v  आवडत असल्यास बदाम पिस्ते पातळ काप करून त्यात घालावेत.

सूचना :
§  महत्त्वाची काळजी दही बनवण्यात घ्यावी. ते आंबट होता काम नये, त्यास तार येता कामा नये.

§  दही थोडे आंबट झाल्यास साखर थोडी जास्त लागेल.