Thursday, July 6, 2017

घडीची पोळी


साहित्य : - मोठे डाव कणिक, पाव चमचा मीठ, तेल, पाणी, चमचा दही
कृती : - एका गोल पसरट भांड्यात कणिक घ्या. शक्यतो चाळू नका कारण पीठातून कोंडयावाटे फायबर्स निघून जाऊ नयेत.
त्यात मीठ आणि दही घालून मिसळून घ्या.
गरजेनुसार पाणी हळूहळू घालत कणिक भिजवून घ्या.
रोजच्या पोळ्यांची कणिक ही फार घट्ट अथवा फार सैल असता कामा नये.
योग्य घट्ट भिजवल्यावर साधारण / चमचे तेल घालून छान मळून घ्या. हाताला किंवा भांड्याला कुठेही कणिक चिकटून राहणे ही कणिक नीट भिजली गेल्याची खूण आहे.
पोळ्या करण्यापूर्वी साधारण अर्धा तास अशी कणिक भिजवून ठेवणे उत्तम.
पोळी लाटण्याआधी पुन्हा एकदा कणिक नीट तिंबून घ्या.
मोठ्या लिंबापेक्षा थोडे मोठे असे एकसारखे गोळे करून घ्या.
ताव तापत ठेवा.
पिठी म्हणून लावण्यासाठी शक्य असल्यास तांदूळ पिठी घ्या. म्हणजे पोळी लाटताना सरसर सरकते. नसल्यास गव्हाचे पीठ ही चालू शकते.
गोळा पुरीएवढा लाटून घ्या.
त्यावर तेलाचा हात फिरवून थोडी पिठी भुरभुरावा.
मधे घडी घालून पुन्हा तेलाचा हात आणि त्यावर पिठी घालून अजून निम्यात घडी घाला.
आधी अर्धगोल आणि नंतर पाव- गोल अशी घडी होईल.
ही पोळीची घडी पिठीत घोळवून पुन्हा लाटायला सुरुवात करा.
सुरुवातीस तिन्ही कडा लाटून गोल आकार द्या.
आता पुन्हा साधारण गोल आकाराची जाड पोळी होईल.
आता कडकडून लाटत पोळी मोठी लाटून घ्या. साधारण डावीकडून उजवीकडे गोल अशारितीने लाटावी.
सर्वात शेवटी मधून एकसारखी करून घ्यावी.
योग्य तापलेल्या तव्यावर पोळी टाकून / सेकंदात उलटावी.
दुसरी बाजू नीट भाजून घ्यावी. पुन्हा पोळी उलटून भाजून घ्यावी. यावेळी पोळी फुगेल आणि तिचे पदर सुटतील.
कणिक योग्य रितीने भिजवली असेल आणि नंतर नीट लाटली असेल तर पोळी मऊसूत, टम्म फुगलेली आणि पदर सुटलेली होते. अशी पोळी पूर्ण दिवस चांगली राहते. कडक किंवा चामट होता. दही घातल्याने पोळी अजून मऊ बनते.

शाही व्हेज पुलाव

बिर्याणी मसालेदार असते, अनेकदा खाल्यानंतर जळजळते, त्रास होतो. पुलाव फार कोरडा आणि तितकीशी छान चव नसलेला असतो अशी तुमची जर तक्रार असेल आणि या दोन्हीचा सुवर्णमध्य गाठेल असा भाताचा एखादा छानसा प्रकार तुम्हाला आवडेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच करायला, बनवून खिलवायला आणि स्वतः खायला नक्कीच आवडेल. करून बघा आणि मला नक्की  कळवा कशी बनली ते!

साहित्य : १ मोठी वाटी बासमती (शक्यतो जुना ), अर्धी वाटी प्रत्येकी उभे चिरून गाजर, फरसबी, बेबी कॉर्न, सिमला मिरची. अर्धी वाटी स्वीट कॉर्न, अर्धी वाटी मटार, एक वाटी फ्लॉवर चे तुकडे, ३ कांदे उभे पातळ चिरून, अर्धी वाटी पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे, दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध, ३/४ लवंगा, काळे मिरे आणि बडी इलायची, २/३ पाने तमालपत्र, २ लहान तुकडे दालचिनी, एक मूठभर पाने प्रत्येकी कोथिंबीर आणि पुदिना, २/३ चमचे साखर, चवीप्रमाणे मीठ, १०० ग्रॅम खवा, २/३ हिरव्या मिरच्या, ४/५ पाकळ्या लसूण, अर्धा इंच तुकडा आले, १/२ लाल सुक्या मिरच्या, एक चिमूट केशर थोड्या गरम दुधात खलून, ५/७ चमचे साजूक तूप, तळण्यासाठी तेल अर्धी वाटी, काजू आणि बेदाणे.

कृती : एक तासभर आधी तांदूळ नीट निवडून, धुवून निथळून ठेवा. पाणी राहू देऊ नका.

भाज्या चिरून घ्या. कांदा आणि सिमला मिरची सोडून सर्व भाज्या पाण्यात अर्धवट उकळून घ्या. पाण्यातून निथळून घ्या. जास्त शिजता कामा नयेत. तसेच रंग बदलता कामा नये.
एका जाड तळ असलेल्या पॅन मध्ये ३/४ चमचे तूप गरम करून घ्या. दुसरीकडे पाणी आणि दूध  आचेवर उकळी येण्यासाठी ठेवा.
तुपात सुक्या लाल मिरच्या ,मिरे, लवंग, बडी इलायची, तमालपत्र आणि दालचिनी घालून परतून घ्या. त्यावर तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घ्या. त्यात स्वीट कॉर्न आणि मटार घाला.
मीठ आणि साखर घालून त्यावर उकळी आलेले दूध पाणी घाला. पाणी आटे पर्यंत झाकण ठेवू नका. ५ मिनिटे मोठ्या आचेवर ठेवले की साधारण पाणी आटते. आता त्यावर झाकण ठेवून भात शिजू द्या. पण तो जास्त शिजता कामा नये.
झाकण काढून एका मोठ्या परातीत पसरून भात गार करून घ्या.
एका पॅन मध्ये उरलेले तूप घ्या.
पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या , आले व लसूण एकत्र पाव चमचा मीठ घालून बारीक वाटून घ्या. वाटताना शक्यतो पाणी नको किंवा अगदीच थोडेसे.
गरम तुपात हि पेस्ट घालून परतून घ्या. त्यात खावा घालून पुन्हा परता. सिमला मिरचीचे तुकडे घालून परता. साधारण हे मिश्रण पुन्हा तूप सोडू लागले की गॅस बंद करा.
या पण मध्ये शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या आणि पनीर चे तुकडे  मिसळून घ्या चवी प्रमाणे त्यात मीठ घालून घ्या. अतिशय हलक्या हाताने मसाला भाज्यांना लागेल असे पहा.
कांदा उभा पातळ चिरून घ्या. तो तळण्या पूर्वी काजू आणि बेदाणे तळून बाजूला ठेवा.
कांदा ब्राउन तळून घ्या.
भात शिजवलेल्या पॅन मध्ये (हा पॅन शक्यतो ज्याचे वरून तोंड लहान किंवा आवळलेले आहे असे (डेगची सारखे ) असावे ज्यात वाफ चांगली देता येते असे.


या भांड्यात भाताचा एक थर, त्यावर मसाला लावलेल्या भाज्यांचा एक थर या प्रमाणे थर देऊन घ्या सर्वात वरचा थर भाताचा यायला हवा.
केशर वर शिंपडा. शक्य असल्यास झाकण ठेऊन  भिजवलेल्या घट्ट कणकेने सील करा.
मंद आचेवर एक चांगली वाफ आणून गॅस बंद करा.
वाढण्यापूर्वी तळलेले काजू, बेदाणे आणि कांदा घालून वाढा. भात भांड्यातून काढताना उभा झारा घालून भात काढून घ्या म्हणजे भात तशाच थरांमध्ये बाहेर येईल. हा पुलाव वाढेपर्यंत प्रत्येक वेळी हलक्या हाताने हाताळा जेणेकरून शिते अख्खी आणि लांब तशीच राहतील.




Wednesday, July 5, 2017

अप्पम आणि चटणी


अप्पम  

साहित्य : - ३ वाट्या साधे तांदूळ, १ वाटी शिजलेला भात, १ वाटी चुरमुरे
कृती : - तांदूळ साधारण ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.
भात ही शिजून गार झालेला असावा.
साहित्य वाटण्यापूर्वी चुरमुरे पाण्यात भिजवून, निथळून घ्या.
भिजलेले तांदूळ, शिजलेला भात व चुरमुरे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
वाटलेले मिश्रण सारखे करून ४/५ तास झाकून ठेवा.
हे मिश्रण इडली किंवा डोशाच्या पिठासारखे फुलून येणे अपेक्षित नाही.
अप्पम करण्यासाठी "अप्पम चाटी" नावाची पसरट कढई झाकणासह असलेली विकत मिळते.
ती नसल्यास पसरत नॉन स्टिक पॅन गरम करून घ्या.
पिठात चवीप्रमाणे मीठ घालून सारखे करून घ्या.
त्यात एक मोठा डाव पीठ घालून, कढई दोन्ही हाताने गोल फिरवून अप्पम सर्वत्र पसरून घ्या.
अप्पम हा मध्ये थोडा जाड आणि कडेने पातळ बनतो.
झाकण ठेवून अप्पम बनवून घ्या. योग्य प्रकारे पसरवलेला असेल तर उलटून दुसऱ्या बाजूने भाजण्याची गरज नसते.
परंतु सुरुवातीस मध्ये जास्तच जाड होतो आहे असे वाटल्यास उलटून दुसरी बाजूही हलकेच भाजून घ्या.


एकंदरीतच साऊथ इंडियन खाण्यात विविध चटण्या असतात. इडली सोबत खाऊ शकू अशी वेगळी, डोशा सोबत नारळाचीच पण थोडी घट्ट.  अप्पम सोबत एक वेगळीच चटणी छान लागते. पांढरा शुभ्र लुसलुशीत अप्पम आणि केशरी लाल छटा असलेली नारळाची चटणी हे चवीस जितके छान लागते तितकेच डोळ्यांना ही सुखावते.

अप्पम चटणी : - एक नारळाची वाटी खवलेली, १ छोटा कांदा आणि १ टोमॅटो बारीक चिरून, ४/५ लसूण पाकळ्या, लहानसा आल्याचा तुकडा, २ चमचे धने, २२ चमचे पंढरपुरी डाळे, १ चमचा उडीद डाळ, ३/४ लाल सुक्या मिरच्या , अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, १ चमचा साखर,  पाव चमचा मोहरी, २ चमचे तेल, कढीपत्ता ५/६ पाने
कृती : - एका कढईत तेल गरम करून घ्या.
मोहरी घालून ती तडतडली की उडीद डाळ घालून परतून घ्या लाल व्हायला हवी.
डाळे घालून परता.
त्यात सुक्या मिरच्या आणि धने घाला. परतून घ्या.
त्यात लसूण, आले, कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घ्या.
कांद्याचा रंग बदलून गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटो घाला परतून घ्या.
शेवटी ओले खोबरे, मीठ आणि साखर घालून २ मिनिट परतून मिश्रण गार होऊ द्यात.
गार मिश्रण थोडे पाणी घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
अप्पम सोबत खायला द्या. 

Monday, July 3, 2017

कुछ हटके .....चवळी मसालेदार

अनेकदा मुले भाज्या किंवा उसळी खात नाहीत अशी अनेक आयांची तक्रार असते. खरेतर अनेक भाज्या कडधान्ये ज्या पारंपरिक पद्धतीने बनवली जातात ती आपण मोठ्यांनाच आवडत नाहीत. मग जो पदार्थ खाण्यासाठी आपणच तयार नसतो तो खाण्यासाठी आपण कसे कोणाला भरीस घालणार. लहान मुलांच्या बाबत तर ते अजूनच कठीण.  ट्वीस्ट देऊन वेगळे पदार्थ किती वेळा बनवणार आणि ते खरंच रोजच्या जेवणाला पर्याय बनू शकतात का  एक प्रश्न? म्हणजे राजमा उसळ नाही खायचीये टॅकोस बनाव किंवा भाज्या पराठे, पावभाजी च्या रूपात खाऊ घाल. दुधीची भाजी आवडत नाही त्याचे मुठिये बनव. हे कधीतरी ठीक आहे पण मग कधीतरी तो भाजी / उसळीच्या रूपात ही खाता यायला हवा.
माझ्यासाठी चवळी आणि मसूर ही ती दोन कडधान्ये होती, दुधी कारले या भाज्या होत्या. पण लेकीला सर्व खाता पाहिजे या आग्रहाखातर थोडा बदल करत मी ते पदार्थ बनवू लागले. मलाही ते आवडू लागले आणि तिलाही!

चवळी मसालेदार :
साहित्य : - १ वाटी मध्यम आकाराची चवळी, २ वाट्या पाणी, ३ चमचे तेल, ५/६ कढीपत्ता पाने, १ मोठा कांदा, १ मोठा लालबुंद टोमॅटो, जिरे, २ चमचे लाल तिखट, १ चमचा पावभाजी मसाला, ४ मोठे चमचे खवलेले ओले खोबरे, मीठ, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : - प्रथम चवळी निवडून घ्या. एका पण मध्ये १ चमचा तेल घालून मंद आचेवर ती भाजून घ्या. गरम पाण्यात घालून ती प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या.
पॅन मध्ये २ चमचे तेल गरम करून घ्या त्यात जिरे घालून रंग बदलला की कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
त्यात टोमॅटो आणि आणि कढीपत्ता घालून ३/४ मिनिटे परतत राहा.
त्यावर लाल तिखट घालून पुन्हा परतत राहा तेल सुटे पर्यंत.
शिजलेली चवळी त्यात घाला. ओले खोबरे घाला.
याच मिश्रणातील ३/४ चमचे मिक्सर मधून बारीक वाटून पुन्हा ते या उसळीत मिसळा.
मी उसळी बनवताना फार मसाले किंवा ग्रेव्हीवाले पदार्थ वापरत नाही, आणि म्हणून दाटपणा येण्यासाठी मला थोडी उसळच वाटून त्यात मिसळणे चांगले वाटते.
आता गरजेप्रमाणे पाणी घाला. मीठ, साखर आणि पावभाजीचा मसाला घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५/६ मिनिटे उकळून मग आच बंद करा.
वाढताना कोथिंबीर घालून वाढा.


Sunday, July 2, 2017

खिचडी, कढी

मुगाची खिचडी : - साहित्य - १ वाटी मऊसर भात होईल असे तांदूळ (आंबेमोहोर किंवा इंद्रायणी) १ वाटी मूग डाळ (आवडत असल्यास सालासह ) ७ वाट्या पाणी उकळून, ३ चमचे साखर, २ चमचे तेल, १ चमचा गोडा मसाला, २ चमचे धनाजीरा पूड, फोडणी साठी मोहरी, हिंग हळद, २/३ हिरव्या मिरच्या, ७/८ कढीपत्ता पाने, मूठभर किसलेले सुके खोबरे, १ चमचा पांढरे तीळ, एक चमचा धने, अर्धा इंच दालचिनी तुकडा

कृती : -
डाळ व तांदूळ निवडून, धुऊन निथळून बाजूला ठेवा.
एका कढईत धने, खोबरे, तीळ आणि दालचिनी भाजून घ्या, गार व्हायला बाजूला ठेवा
त्याच कढईत बेताचे तेल घालून जे तळण आहे ते तळून घ्या. कुरडई टाळायला  जास्त तेल लागते, तुलनेने पापड छोटे तुकडे करून कमी तेलात तळले शकतात. शक्यतो तेल जास्त होणार नाही या अंदाजाने तेल घ्या. म्हणजे ते ठेऊन पुनर्वापराचा प्रश्न येऊ नये.
तळलेले पापड, कुरडई सांडगी मिरची हे हवाबंद डब्यात ठेवून द्या.
गॅस मंद करून तेलात मोहरी, मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि शेवटी हळद या क्रमाने घालून मग त्यावर डाळ तांदूळ घाला.
दुसऱ्या गॅसवर पाणी उकळत ठेवा.
खोबरे तीळ धने मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे बाहेर अजून आठ दिवस किंवा फ्रीझमध्ये १५ दिवस सहज टिकू शकते. अर्थात ताज्या वाटलेल्याची चव कायमच छान लागते.
डाळ तांदूळ परतले जात असताना  त्यात मीठ, साखर, गोडा मसाला, धनाजीरा पूड आणि २ चमचे वाटलेले खोबरे तीळ घालून परता.
त्यावर उकळलेले पाणी घालून हलवा. गॅस मोठ्या आचेवर असूद्यात.
पाणी थोडे आटले की गॅस मंद करून त्यावर झाकण ठेवा. अधून मधून हलवत राहा.
ही खिचडी थोडी मऊ होईल. वाढताना वरून कोथिंबीर आणि साजूक तूप घालून द्या.
साजूक तूप नको असल्यास अजून एक  करता येण्यासारखे - २ चमचे तेल गरम करा. त्यात ५/७ लसूण पाकळ्या सोलून ठेचून घाला, न जळता त्या कुरकुरीत व्हायला हव्यात, त्यात अर्धा चमचा लाल तिखट घालून ते या खिचडीवर घालून दिले जाऊ शकते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कढी : - साहित्य - एक वाटी थोडे आंबट घट्ट दही, २/३ वाट्या पाणी, २ चमचे हरबरा डाळीचे पीठ, २/३ चमचे साखर, ५/६ कढीपत्त्याची पाने, ३/४ सुक्या लाल मिरच्या, २/३ लवंगा, २/३ वेलदोडे, चिमूटभर मेथी दाणे, मीठ, फोडणी साठी साजूक तूप आणि जिरे

कृती : -
एका जाड पातेल्यात दही घुसळून घ्या. कढी घट्ट किंवा पातळ आवडीनुसार पाणी कमी जास्त घाला.
त्यात मीठ, साखर, डाळीचे पीठ घालून सारखे करून घ्या. पिठाची गुठळी राहता काम नये.
एका छोट्या कढल्यात तूप घ्या, मंद आचेवर गरम करा. लक्षात असुद्या की तूप पटकन जळते.
त्यात जिरे, लवंग, मेथी दाणे आणि वेलदोडा घाला, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून गॅस बंद करा.
ही फोडणी टाकत मिसळून, ते गॅस वर मंद आचेवर उकळून घ्या. उकळी येण्याआधी सतत ढवळत राहा कारण कधीकधी ताक हि फाटते आणि कढीत चोथा जाणवतो.
या कढीत चवीत बदल म्हणून कधी फोडणीत २/३ लसूण पाकळ्या घालू शकता किंवा कधी पाव चमचा आले किसलेले.
पदार्थ तेच असले तरी थोडासा चवीत केलेला बदल त्याची लज्जत वाढवतो हे नक्की.


अशी वाफाळती साजूक तूप वरून घालून मऊसर खिचडी, गरम गरम सर्व चवींनीयुक्त कढी, सोबत आवडीनुसार पापड, कुरडई किंवा तळणीची सांडगी मिरची .... या सिझन मध्ये शांतपणे घरात जेवण्यासाठी अजून काय हवे ?

सुट्टी काम आणि जेवण

कंफर्ट फूड चा जमाना आहे. सध्याचा पावसाळी मौसम जरी चटपटीत खाण्याची इच्छा निर्माण करणारा असला तरी अशा एखाद्या खाण्यानंतर हे पोटासाठी फार ठीक नाही ही जाणिव  ही होतेच. धुवांधार पावसाचे दिवस, त्यातून इतर काही प्लॅन नसलेला वीकेंड. पण ऑफिसचे काम संपवायचे आहे हे मनात आहेच. फक्त रोजच्याप्रमाणे तयार होऊन ऑफिसला न जाता घरूनच पूर्ण दिवस काम करायचे आहे हे नक्की केले आहे. जेवण आणि इतर नित्याची सर्व कामे मागे टाकून दिवसभर ऑफिसच्या कामात स्वतःला बुडवून घेतले. चहा, कॉफी, ओट्स आणि ब्राउन ब्रेड आणि चीझस्प्रेड हे पदार्थ गेला आठ दहा तास पोटाचा आधार होते.

चहाचा पहिला कप घेऊन लॅपटॉप समोर अवतरले. सोबतीला जुनी हिंदी गाणी पुरेसा कामाचा मूड, गरजेपुरतेच मधेमधे जागेवरून उठून पुन्हा सुरु केलेले काम. तसेही सुट्टीच्या दिवशी जास्त चांगले काम होते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो. स्काईपवर कोणी बोलायला विचारायला येत नाही. कोणी डिस्टर्ब करत नाही. संध्याकाळी पाचच्या सुमारास पुरेसे आणि मनाजोगते काम झाले आहे याची जाणिव समाधान देणारी आहे. लॅपटॉप बंद करून आता खरा वीकेंड सुरु झालाय  आता पुढे काय करायचे हा विचार !


टेरेसमधून बाहेर डोकावले तर धों धों पाऊस कोसळतोय. तसे माझे आणि पावसाचे फार जवळचे नाते नाही. त्यामुळे गरज नसताना मी मुद्दाम भिजण्याची मजा घेण्यासाठी एकटीच बाहेर पडणे हे निव्वळ अशक्य. त्यामुळे मी बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्बभवत नाही. कुंडीतून गवती चहा ची एक पात घेऊन स्वतःसाठी मस्त चहा बनवून घेत, पावसाला बघत चहा घेऊन उरलेल्या वेळेचे काय करायचे हा विचार मनात. मस्त चहाने मूड अजून छान केलाय. शेवटी ठरले असे की आधी थोडा वेळ घरावरून आवश्यक त्या साफसफाई साठी हात फिरवायचा. मग मस्त फ्रेश होऊन देवपूजा आणि नंतर छानसे जेवण बनवून स्वतःलाच खुश करायचे. त्यानंतर जमले तर एखादा सिनेमा बघायचा.

छानसे जेवण म्हणजे माझ्या दृष्टीने अनेकदा साधे, सकस  ताजे बनवलेले आणि वाफाळते गरम असे असते. अनेक पदार्थ जे ही माझी अट पुरी करतात. जसे की साधा वरण भात तूप लिंबू, पुलाव आणि टोमॅटो सार, इडली सांबार, लोणी थालीपीठ, सूप आणि सलाड किंवा सूप आणि गार्लिक ब्रेड, खिचडी कढी आणि पापड, घरी बनवलेला भरपूर भाज्या घातलेला पास्ता, जास्त प्रमाणात भाज्या घालून केलेला पराठा, अगदीच सोपा म्हणजे तांदूळ आणि मूग डाळ भरपूर पाण्यात शिजवून त्या पाण्यासकट मिक्सितून फिरवून त्यात मीठ जिरेपूड आणि साजूक तूप चालून गरम गरम पिणे  ..... असे अनेक. आज हा मला खुश करण्याचा मान मिळालाय खिचडी, कढी आणि पापड यांना.

Saturday, July 1, 2017

खिचडी कढी आणि पापड

                                                                                    ।। श्री ।।

कहतें हैं के खाना यादोंमें बसता हैं |

किती खरे आहे ना हे! दर दिवशी चवीचवी चे पदार्थ चाखत असतानाही एखाद्या साध्या सोप्या पदार्थाची चव मनात रेंगाळत राहणे. कित्येकदा आपण नव्याने बनवलेला एखादा उत्तम जमलेला पदार्थ पुन्हा न केल्याने विस्मृतीत जाणे, अचानक आठवणींच्या पोतडीतून बाहेर येणे, आणि अरे! मी  कसा विसरले हा पदार्थ भाव मनात उमटणे. घरी लोणी काढवायला ठेवले कि पुरणपोळीचा सुगंध मनात दरवळणे, पाऊस पडताच भजी आठवणे, सलग काही दिवस घराबाहेर राहावे लागले की कधी एकदा घरी जाऊन वरण भात तूप लिंबू असे जेवण जेवायला मिळते असे होणे.... आणि असे बरेच काही!

चव जिभेला समजते पण त्याहून अधिक ती मनात वसते. चव आणि तिची आठवण जोडलेली असते  प्रसंगांशी, व्यक्तींशी, काही क्षणांशी, विशिष्ठ जागेशी.  म्हणूनच आईच्या हातचे रव्याचे लाडू, सासूबाईंच्या हातची पुरणपोळी, आत्याच्या हातची सुरळीची वडी, मामीच्या हातच्या पाकातल्या पुऱ्या यांची मनातली चव कायम असते. सिंहगडावरील ताक किंवा झुणका भाकरी, नरसोबाच्या वाडीची बासुंदी, कोल्हापूर मधे मिळणारी मिसळ किंवा आईस्क्रीम,  हे किंवा यासारख्या  काही मनात वसलेल्या चवी ज्या जागेशी संबंधित, आपणच दिलसे कोणा खास व्यक्तीसाठी खास प्रसंगी आधी अनेकदा बनवलेला एखादा पदार्थ, एवढेच नव्हे तर एखाद्या दुःखद प्रसंगी कित्येक तासाच्या ताणानंतर, शेजाऱ्यांनी रितीने आणून दिलेला पिठले भात, तशाही प्रसंगात मनाने  छान चवीची घेतलेली नोंद  ... अशी अनेक उदाहरणे! इसलिये कहतें हैं के खाना यादोंमें बसता हैं! Food is all about memories!

तर हा एक छोटासा प्रयत्न्न.... माझ्या अशा खाण्यासंबंधीच्या असंख्य आठवणी, वेगवेगळे  प्रसंग, व्यक्ती, घटना किंवा जागेशी जोडल्या गेलेल्या. जेवण, खाणे जे मी खरेतर खूप "दिल से " करते. अनेक प्रयोग करत राहते, कधी घडतात कधी बिनसतात. हा प्रयत्न्न त्यांना तुमच्यासमोर आणण्याचा.  पदार्थ साधेच असतील किंवा नेहमीचे असतील सोबतची आठवण खास असेल, कधी छोटासा बदल करून बघत चव वेगळी आणि छान बनवायचा प्रयत्न्न केलेला असेल. कधी पदार्थ त्याच्या बनवण्यातल्या खाचाखोचांसह पेश केलेला असेल. या खाद्य सफरीत एखादी हलकेच हसू आणणारी मजेशीर आठवण असेल, स्वतःची करून घेतलेली फजिती असेल, कधी फोटो असतील कधी नसतील पण जे तुमच्या समोर ठेवले जाईल ते मात्र "दिलसे" असेल!

आपल्या प्रिय व्यक्तीला आवडणारे खाण्याचे पदार्थ सवयीने किंवा प्रेमाने कालांतराने आपल्यालाही आवडू लागतात. माझ्याबाबत अशी पदार्थांची एक यादीच आहे, पुरणपोळी, कॅरॅमल पॉपकॉर्न, फणसाची सांदणे, साबुदाण्याची खिचडी .......  खिचडी कढी हा तसाच काहीसा एक पदार्थ माझ्यासाठी. फारशी मुगाची खिचडी न आवडणारी मी कधी हे स्वतः आवडीने खाऊ लागले ते माझे मलाही कळले नाही. आवडू इतके लागले की आज मला या ब्लॉग ला नाव देण्यासाठी ही तेच नाव योग्य वाटले.

पदार्थ स्वतः बनवून आपल्या जवळच्या व्यक्तीस बनवून खिलवण्यातला आनंद निराळाच! त्यातून त्या व्यक्तीची तात्काळ "वाह " ही दाद मिळणे किंवा तिच्याशिवायही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तृप्त भाव उमटणे यासारखा दुसरा आनंद नाही. हाच आनंद मला virtual जगातून मिळेल तुमच्या प्रतिक्रियांमधून म्हणूनच संवादाचा पूल कायम ठेवून ही खाद्ययात्रा तुमच्या सोबतीने करायचा हा मानस!