Monday, July 3, 2017

कुछ हटके .....चवळी मसालेदार

अनेकदा मुले भाज्या किंवा उसळी खात नाहीत अशी अनेक आयांची तक्रार असते. खरेतर अनेक भाज्या कडधान्ये ज्या पारंपरिक पद्धतीने बनवली जातात ती आपण मोठ्यांनाच आवडत नाहीत. मग जो पदार्थ खाण्यासाठी आपणच तयार नसतो तो खाण्यासाठी आपण कसे कोणाला भरीस घालणार. लहान मुलांच्या बाबत तर ते अजूनच कठीण.  ट्वीस्ट देऊन वेगळे पदार्थ किती वेळा बनवणार आणि ते खरंच रोजच्या जेवणाला पर्याय बनू शकतात का  एक प्रश्न? म्हणजे राजमा उसळ नाही खायचीये टॅकोस बनाव किंवा भाज्या पराठे, पावभाजी च्या रूपात खाऊ घाल. दुधीची भाजी आवडत नाही त्याचे मुठिये बनव. हे कधीतरी ठीक आहे पण मग कधीतरी तो भाजी / उसळीच्या रूपात ही खाता यायला हवा.
माझ्यासाठी चवळी आणि मसूर ही ती दोन कडधान्ये होती, दुधी कारले या भाज्या होत्या. पण लेकीला सर्व खाता पाहिजे या आग्रहाखातर थोडा बदल करत मी ते पदार्थ बनवू लागले. मलाही ते आवडू लागले आणि तिलाही!

चवळी मसालेदार :
साहित्य : - १ वाटी मध्यम आकाराची चवळी, २ वाट्या पाणी, ३ चमचे तेल, ५/६ कढीपत्ता पाने, १ मोठा कांदा, १ मोठा लालबुंद टोमॅटो, जिरे, २ चमचे लाल तिखट, १ चमचा पावभाजी मसाला, ४ मोठे चमचे खवलेले ओले खोबरे, मीठ, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : - प्रथम चवळी निवडून घ्या. एका पण मध्ये १ चमचा तेल घालून मंद आचेवर ती भाजून घ्या. गरम पाण्यात घालून ती प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या.
पॅन मध्ये २ चमचे तेल गरम करून घ्या त्यात जिरे घालून रंग बदलला की कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
त्यात टोमॅटो आणि आणि कढीपत्ता घालून ३/४ मिनिटे परतत राहा.
त्यावर लाल तिखट घालून पुन्हा परतत राहा तेल सुटे पर्यंत.
शिजलेली चवळी त्यात घाला. ओले खोबरे घाला.
याच मिश्रणातील ३/४ चमचे मिक्सर मधून बारीक वाटून पुन्हा ते या उसळीत मिसळा.
मी उसळी बनवताना फार मसाले किंवा ग्रेव्हीवाले पदार्थ वापरत नाही, आणि म्हणून दाटपणा येण्यासाठी मला थोडी उसळच वाटून त्यात मिसळणे चांगले वाटते.
आता गरजेप्रमाणे पाणी घाला. मीठ, साखर आणि पावभाजीचा मसाला घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५/६ मिनिटे उकळून मग आच बंद करा.
वाढताना कोथिंबीर घालून वाढा.


No comments:

Post a Comment