Sunday, July 2, 2017

खिचडी, कढी

मुगाची खिचडी : - साहित्य - १ वाटी मऊसर भात होईल असे तांदूळ (आंबेमोहोर किंवा इंद्रायणी) १ वाटी मूग डाळ (आवडत असल्यास सालासह ) ७ वाट्या पाणी उकळून, ३ चमचे साखर, २ चमचे तेल, १ चमचा गोडा मसाला, २ चमचे धनाजीरा पूड, फोडणी साठी मोहरी, हिंग हळद, २/३ हिरव्या मिरच्या, ७/८ कढीपत्ता पाने, मूठभर किसलेले सुके खोबरे, १ चमचा पांढरे तीळ, एक चमचा धने, अर्धा इंच दालचिनी तुकडा

कृती : -
डाळ व तांदूळ निवडून, धुऊन निथळून बाजूला ठेवा.
एका कढईत धने, खोबरे, तीळ आणि दालचिनी भाजून घ्या, गार व्हायला बाजूला ठेवा
त्याच कढईत बेताचे तेल घालून जे तळण आहे ते तळून घ्या. कुरडई टाळायला  जास्त तेल लागते, तुलनेने पापड छोटे तुकडे करून कमी तेलात तळले शकतात. शक्यतो तेल जास्त होणार नाही या अंदाजाने तेल घ्या. म्हणजे ते ठेऊन पुनर्वापराचा प्रश्न येऊ नये.
तळलेले पापड, कुरडई सांडगी मिरची हे हवाबंद डब्यात ठेवून द्या.
गॅस मंद करून तेलात मोहरी, मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि शेवटी हळद या क्रमाने घालून मग त्यावर डाळ तांदूळ घाला.
दुसऱ्या गॅसवर पाणी उकळत ठेवा.
खोबरे तीळ धने मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे बाहेर अजून आठ दिवस किंवा फ्रीझमध्ये १५ दिवस सहज टिकू शकते. अर्थात ताज्या वाटलेल्याची चव कायमच छान लागते.
डाळ तांदूळ परतले जात असताना  त्यात मीठ, साखर, गोडा मसाला, धनाजीरा पूड आणि २ चमचे वाटलेले खोबरे तीळ घालून परता.
त्यावर उकळलेले पाणी घालून हलवा. गॅस मोठ्या आचेवर असूद्यात.
पाणी थोडे आटले की गॅस मंद करून त्यावर झाकण ठेवा. अधून मधून हलवत राहा.
ही खिचडी थोडी मऊ होईल. वाढताना वरून कोथिंबीर आणि साजूक तूप घालून द्या.
साजूक तूप नको असल्यास अजून एक  करता येण्यासारखे - २ चमचे तेल गरम करा. त्यात ५/७ लसूण पाकळ्या सोलून ठेचून घाला, न जळता त्या कुरकुरीत व्हायला हव्यात, त्यात अर्धा चमचा लाल तिखट घालून ते या खिचडीवर घालून दिले जाऊ शकते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कढी : - साहित्य - एक वाटी थोडे आंबट घट्ट दही, २/३ वाट्या पाणी, २ चमचे हरबरा डाळीचे पीठ, २/३ चमचे साखर, ५/६ कढीपत्त्याची पाने, ३/४ सुक्या लाल मिरच्या, २/३ लवंगा, २/३ वेलदोडे, चिमूटभर मेथी दाणे, मीठ, फोडणी साठी साजूक तूप आणि जिरे

कृती : -
एका जाड पातेल्यात दही घुसळून घ्या. कढी घट्ट किंवा पातळ आवडीनुसार पाणी कमी जास्त घाला.
त्यात मीठ, साखर, डाळीचे पीठ घालून सारखे करून घ्या. पिठाची गुठळी राहता काम नये.
एका छोट्या कढल्यात तूप घ्या, मंद आचेवर गरम करा. लक्षात असुद्या की तूप पटकन जळते.
त्यात जिरे, लवंग, मेथी दाणे आणि वेलदोडा घाला, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून गॅस बंद करा.
ही फोडणी टाकत मिसळून, ते गॅस वर मंद आचेवर उकळून घ्या. उकळी येण्याआधी सतत ढवळत राहा कारण कधीकधी ताक हि फाटते आणि कढीत चोथा जाणवतो.
या कढीत चवीत बदल म्हणून कधी फोडणीत २/३ लसूण पाकळ्या घालू शकता किंवा कधी पाव चमचा आले किसलेले.
पदार्थ तेच असले तरी थोडासा चवीत केलेला बदल त्याची लज्जत वाढवतो हे नक्की.


अशी वाफाळती साजूक तूप वरून घालून मऊसर खिचडी, गरम गरम सर्व चवींनीयुक्त कढी, सोबत आवडीनुसार पापड, कुरडई किंवा तळणीची सांडगी मिरची .... या सिझन मध्ये शांतपणे घरात जेवण्यासाठी अजून काय हवे ?

No comments:

Post a Comment