अप्पम
साहित्य : - ३ वाट्या साधे तांदूळ, १ वाटी शिजलेला भात, १ वाटी चुरमुरे
कृती : - तांदूळ साधारण ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.
भात ही शिजून गार झालेला असावा.
साहित्य वाटण्यापूर्वी चुरमुरे पाण्यात भिजवून, निथळून घ्या.
भिजलेले तांदूळ, शिजलेला भात व चुरमुरे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
वाटलेले मिश्रण सारखे करून ४/५ तास झाकून ठेवा.
हे मिश्रण इडली किंवा डोशाच्या पिठासारखे फुलून येणे अपेक्षित नाही.
अप्पम करण्यासाठी "अप्पम चाटी" नावाची पसरट कढई झाकणासह असलेली विकत मिळते.
ती नसल्यास पसरत नॉन स्टिक पॅन गरम करून घ्या.
पिठात चवीप्रमाणे मीठ घालून सारखे करून घ्या.
त्यात एक मोठा डाव पीठ घालून, कढई दोन्ही हाताने गोल फिरवून अप्पम सर्वत्र पसरून घ्या.
अप्पम हा मध्ये थोडा जाड आणि कडेने पातळ बनतो.
झाकण ठेवून अप्पम बनवून घ्या. योग्य प्रकारे पसरवलेला असेल तर उलटून दुसऱ्या बाजूने भाजण्याची गरज नसते.
परंतु सुरुवातीस मध्ये जास्तच जाड होतो आहे असे वाटल्यास उलटून दुसरी बाजूही हलकेच भाजून घ्या.
एकंदरीतच साऊथ इंडियन खाण्यात विविध चटण्या असतात. इडली सोबत खाऊ शकू अशी वेगळी, डोशा सोबत नारळाचीच पण थोडी घट्ट. अप्पम सोबत एक वेगळीच चटणी छान लागते. पांढरा शुभ्र लुसलुशीत अप्पम आणि केशरी लाल छटा असलेली नारळाची चटणी हे चवीस जितके छान लागते तितकेच डोळ्यांना ही सुखावते.
अप्पम चटणी : - एक नारळाची वाटी खवलेली, १ छोटा कांदा आणि १ टोमॅटो बारीक चिरून, ४/५ लसूण पाकळ्या, लहानसा आल्याचा तुकडा, २ चमचे धने, २२ चमचे पंढरपुरी डाळे, १ चमचा उडीद डाळ, ३/४ लाल सुक्या मिरच्या , अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, १ चमचा साखर, पाव चमचा मोहरी, २ चमचे तेल, कढीपत्ता ५/६ पाने
कृती : - एका कढईत तेल गरम करून घ्या.
मोहरी घालून ती तडतडली की उडीद डाळ घालून परतून घ्या लाल व्हायला हवी.
डाळे घालून परता.
त्यात सुक्या मिरच्या आणि धने घाला. परतून घ्या.
त्यात लसूण, आले, कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घ्या.
कांद्याचा रंग बदलून गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटो घाला परतून घ्या.
शेवटी ओले खोबरे, मीठ आणि साखर घालून २ मिनिट परतून मिश्रण गार होऊ द्यात.
गार मिश्रण थोडे पाणी घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
अप्पम सोबत खायला द्या.
No comments:
Post a Comment